खडकाळ माळरानावर मोगरा फुलवणारी नवदुर्गा! आदिवासी दुर्गम भागात राहुनही साधली प्रगती
आदिवासी दुर्गम भागातील वडोली चिरेचापाडा या गावातील जयश्री प्रवेश कनोजा या आदिवासी समाजातील महिलेने खडकाळ माळरान मोगऱ्याने फुलवलं आहे.या नवदुर्गेने आपल्यासोबत परिसरातील महिलांनी उभ राहण्यास मदत केलीय.
पालघर : जव्हार तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील वडोली चिरेचापाडा या गावातील जयश्री प्रवेश कनोजा या आदिवासी समाजातील महिलेने स्वकष्टातून माळरान फुलवलंय. यातूनच ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. नववी शिक्षण असलेल्या जयश्री यांनी आपल्यासोबत परिसरातील महिलांनाही स्वतःच्या पायावर उभ राहण्यास मदत केली आहे.
रोजगारासाठी शहराकडे न जाता जयश्री यांनी उमेद अभियाना अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपल्या शेतीत प्रयोग केला. सुरुवातीला जयश्री यांनी आपल्या 5 गुंठे जागेत 200 मोगऱ्याच्या रोपांची लागवड केली. येणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे गजरे करून जयश्री यांनी परिसरात विकण्यास सुरुवात केली. यातून त्यांना दिवसाला शंभर ते दोनशे रुपये मिळत असत. मात्र, याच व्यवसायात वाढ करत 200 आणखी रोप वाढवून जयश्री यांनी 10 गुंठे जाग्यात 400 मोगरा झाडांची लागवड केली आहे. त्यातूनच मोगरा संघ निर्माण करून निघणारा मोगरा दादर येथे पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना सध्या रोज हजार ते दोन हजार रुपये मिळतात.
नुसता मोगरा लागवडीवर न थांबता जयश्री यांनी आपल्या शेतातील नाचणीपासून पापड, लाडू, चकली, शेवया असे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. घरातच जीवामृत, दशपर्णी अर्क, ब्रम्हाश्र, या घरघुती खतांची निर्मिती करून त्या विक्री करतात. त्याच बरोबर जयश्री सध्या कृषी सखी म्हणून काम पाहतात. इतकच नव्हे तर जयश्री जंगलात जाऊन रानफुले, रान फळे गोळा करून ती ड्रायर वर सुकवून मोहफुलांचे लाडू, त्याचप्रमाणे इतरही रानमेवा सुकवून प्रक्रिया करून विक्री करतात. आजच्या घडीला अनेक महिला बचत गट एकत्र येऊन काम करत असल्याने जयश्री यांच्या संघाला हिरकणीच्या माध्यमातून अडीच लाख रुपये पारितोषिकही मिळाले आहे. यातून त्यांनी पापड तयार करण्याचं मशीन विकत घेऊन आपली प्रगती साधली आहे.
अतिदुर्गम असलेल्या जव्हार सारख्या भागात राहूनही आपली प्रगती कशी साधायची याचं मूर्तीमंत उदाहरण जयश्री यांनी समोर ठेवले आहे. प्रयत्न केले तर खडकाळ माळरानावरही शेती फुलवता येती हे त्यांनी दाखवून दिलंय. चिकाटीची कास धरून आपल्या कुटुंबाचं अर्थाजन करून इतर महिलांनाही व्यावसायिक बळ देणाऱ्या जयश्री कनोजा या नवदुर्गेचा आदर्श सर्वच महिलांना मिळेल ह्यात शंका नाही.
Special Report | मावळच्या रुपाली गायकवाड यांची शेतात क्रांती; शेतीतील नवदुर्गा 'माझा'वर