घाबरल्यामुळे उद्धव ठाकरे पोलिसांचा आडोसा घेत आहेत ; नवनीत राणांची टीका
Navneet Rana On Cm uUdhav Tackeray : घाबरल्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिसांचा आडोसा घेत आहेत, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
Navneet Rana On Cm uUdhav Tackeray : "आजची शिवसेना ही गुंडांची शिवसेना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच गुंड पाठवून आमच्या घरावर हल्ला केला. मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेला मतदार मतपेटीतून उत्तर देतील. शिवसेनेला आम्ही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच आमच्या घरावर हल्ला झाला. उद्धव ठाकरे घाबरल्यामुळे पोलिसांचा आडोसा घेत आहेत, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावरही टीका केली.
मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडून नये म्हणून कायर्यकर्त्यांना सोबत न घेता आम्ही पती-पत्नी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार होतो. परंतु, दडपशाही करत आम्हाला रोखण्यात आले. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्यामुळे आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. शिवसेना आणि त्यांच्या गुंडांना आम्ही घाबरत नाही. आम्ही समजूतदारपणाने आंदोलन मागे घेतले, असे नवनीत राणा यांनी सांगितले.
पोलिसांना सूट दिल्यामुळे शिवसैनिकांनी बॅरिकेट तोडून आमच्या घरावर हल्ला केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. याबरोबरच आमच्या घरावर हल्ला केला त्यावेळी पोलीस कोठे होते? असा प्रश्नही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला.
"मुख्यमंत्र्यांना आता काहीच काम उरले नाही. त्यामुळे ते फक्त आंदोलनावर लक्ष ठेवून होते. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव आहे. त्यामुळे पोलीस आम्हाला येथून जाण्यासाठी विनंती करत आहेत. आम्ही कोणालाही घाबरणार नाही. यापुढेही आम्ही धर्माचा प्रचार आणि प्रसार करत राहणार, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा अन् उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक
नवनीत राणा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र कौतुक केले. अजित पवार यांनी फोनवरून आमची चौकशी केली आणि आमच्यासोबत संवाद साधला. अजित पवार आज मुख्यमंत्री असते तर एवढी परिस्थिती चिघळली नसती, असे कौतुक नवनीत राणा यांनी यावेळी अजित पवार यांचे केले.
महत्वाच्या बातम्या