महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
नक्षलग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देऊन शिक्षण क्षेत्रात वेगळं स्थान जपलेल्या मंतैय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
गडचिरोली : केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील 2 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील सागर बगाडे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या घोषणेनंतर दोन्ही शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन्ही शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात दाखवलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राजधानी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्याहस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना (Teacher) हा राष्ट्रीय पुरस्कार (National Award) जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर (Kolhapur) येथील सागर बगाडे व गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एम.ए.बी.एड.असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. 5 सप्टेबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बेडके आणि बगाडे यांना रजत पदक व 50 हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील सौ.स.म.लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे यांना यंदाचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024' जाहीर झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज 27 ऑगस्ट रोजी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. रोख 50 हजार रुपये, रौप्यपदक व प्रमाणपत्र असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. देशभरातील 50 शिक्षकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देऊन शिक्षण क्षेत्रात वेगळं स्थान जपलेल्या मंतैय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे कोल्हापूरच्या बगाडे सरांचा जीवनप्रवासही आदर्श निर्माण करणारा आहे. शून्यातून सुरुवात करत शिक्षक, कलाशिक्षक, नृत्यदिग्दर्शक ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रवास थक्क करणारा आहे, अशा शब्दांत अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सागर बगाडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन, त्यांच्याशी समरस होऊन अध्यापन करणारे शिक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. कलाशिक्षक ही बगाडे यांची ओळख.
हेही वाचा
चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटीलच लढणार? फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत, अजितदादांच्या आमदाराचे काय?