चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटीलच लढणार? फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत, अजितदादांच्या आमदाराचे काय?
Chandgad Assembly Election : कागलची पुनरावृत्ती चंदगडमध्ये टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या शिवाजी पाटलांचे नाव अप्रत्यक्षपणे सूचवल्याची चर्चा आहे.
![चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटीलच लढणार? फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत, अजितदादांच्या आमदाराचे काय? devendra fadnavis announcement shivaji patil bjp candidate for chandgad vidhan sabha vs ncp rajesh patil kolhapur maharashtra news चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटीलच लढणार? फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत, अजितदादांच्या आमदाराचे काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/27/255e7b068bfe592ebd282e29c15b462f172476910183293_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्या पक्षाची अस सर्वसाधारण महायुतीमधील जागावाटपाचं सूत्र असताना आता त्याला कुठेतरी छेद मिळत असल्याचं दिसत आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची प्रचिती येण्याची शक्यता आहे. ठाण्यातील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील चंदगड विधानसभेसाठी अप्रत्यक्षपणे शिवाजी पाटील यांच्या नावाचे संकेत दिले. ठाण्याप्रमाणे चंदगडचे लोकही शिवाजी पाटलांना भरभरून आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत. पण भाजपचे शिवाजी पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. 2019 साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांना निसटता विजय झाला होता.
पराभव झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून शिवाजी पाटील यांनी भाजपचं काम सुरू केलं आणि चंदगड तालुक्यामध्ये भाजप घराघरात पोहोचवला. त्यामुळे यंदा भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार हे नक्की होतं. पण अजित पवार सत्तेत आले आणि इथली गणितं बदलली. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवारांसोबत गेल्याने शिवाजी पाटलांची गोची झाल्याचं दिसतंय.
कागलची पुनरावृत्ती नको म्हणून घोषणा केल्याची चर्चा
ज्या ठिकाणी जो आमदार ती जागा त्या पक्षाला असं सर्वसाधारण चित्र असल्याने भाजपच्या इच्छुकांची अडचण झाली. त्यामुळेच भाजपचे जिल्ह्यातील बडे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. तसाच धक्का चंदगडमध्ये बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस सक्रिय झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण चंदगडमधून शिवाजी पाटील हेच उमेदवार असतील हे सूचवलं आहे.
कोण आहेत शिवाजी पाटील?
शिवाजी पाटील हे मूळचे चंदगडमधील इनाम सावर्डे या गावचे आहेत. उद्योगधंद्याच्या निमित्ताने ते ठाण्यामध्ये असतात. शिवाजी पाटील हे सध्या चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या माथाडी कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच ते भाजपच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत.
अजितदादांचा आमदार काय करणार?
अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटलांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार म्हणून चंदगडची जागा आपल्यालाच मिळेल असं समजून ते कामालाही लागले आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढवायचीच असा निश्चय शिवाजी पाटलांनी केला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)