राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या तरुणाच्या कुटुंबाची कोरोनामुळे परवड, पुरस्कार विजेता तरुण करतोय मोलमजुरी
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. अनेक कारखाने,उद्योगधंदे बंद झाले आणि लाखों नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली
नांदेड : 2018 साली राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त एजाजच्या कुटुंबाची कोरोनामुळे परवड सुरू आहे शाळकरी वयात असामान्य धैर्य दाखवून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता नदी प्रवाहात बुडणाऱ्या दोन मुलींना जीवदान देणाऱ्या एजाज नदाफला पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.
नांदेड जिल्ह्यातील पारडी येथे 2018 साली शाळकरी वयात असणाऱ्या एजाज नदाफ या दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कपडे धुण्यास गेलेल्या चार मुली नदी प्रवाहात बुडत होत्या एजाजने असामान्य धैर्य दाखवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन मुलींचा प्राण वाचवले व जीवदान दिले.परंतु इतर दोन मुलींचा जीव वाचवताना त्याला दुसऱ्या दोन मुलींचा जीव वाचवता आला नाही याचे दुःख मात्र त्याच्या मनात नेहमीच सलतेय.
एजाज नदाफ हा नांदेड जिल्ह्यातील पारडी या गावाचा रहिवाशी असून भूमीहीन शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहे. त्याचे आई वडील,भाऊ मोलमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. 2018 साली एजाजच्या या शौर्याबद्दल त्याला भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्याच प्रमाणे त्याच्या अचाट शौर्याची दखल घेऊन जिल्हा भरातील विविध सामाजिक संघटना,प्राशकीय यंत्रणेकडून त्याचा विविध पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. एवढेच नाही तर नांदेड जिल्हा परिषदेत विशेष ठराव घेऊन त्याच्या शिक्षणाचा पुढील सर्व खर्च मोफत करण्यात येईल. तसेच त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत ,शासकीय योजनेतून राहण्यासाठी घरकुल व शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासनही देण्यात आले.
एजाजला दहावीत 70 टक्के गुण मिळाले पुढील शिक्षणासाठी नांदेडला जाऊन सायन्स घेऊन शिक्षण घेण्याचा त्याचा मानस होता. परंतु पैशाअभावी त्याला कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. कॉलेजात शिक्षण सुरू झाले परंतु बारावीची परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. शौर्य पुरस्कार मिळाल्या नंतर संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो म्हणणारी कोणतीही सामाजिक संस्था अथवा प्रशासकीय यंत्रणा एजाजच्या मदतीसाठी धावून आली नाही. शेवटी एजाजने स्वतः मोलमजुरी करून यावर्षी परीक्षा फी भरली व बारावीत तब्बल 82 टक्के गुण घेतले. परंतु दिलेली आश्वासने ही फक्त फोटो काढण्या इतपत व वर्तमान पत्रातील बातमी येईपर्यंतच राहिले आणि हवेत विरले.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. अनेक कारखाने,उद्योगधंदे बंद झाले आणि लाखों नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली. या कोरोना महामारीचा फटका एजाजच्या कुटुंबालाही बसला.त्यामुळे आर्थिक हलाखीत असलेल्या एजाज ला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी मजुरी करण्याची वेळ आलीय. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता एजाज आज त्याच्या गाव परिसरातील शेतावर केळीची झाडे वाहण्याचे मजुरीवरील काम करतोय.त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या बाल शौर्य पुरस्कार विजेत्या एजाज नदाफला मोलमजुरी करून कुटुंब चालवावे लागत आहे. यापेक्षा दुर्भाग्य नाही.