Chhagan Bhujbal : कांद्याच्या निर्यातीवर बंधने आणूच नका, जो काही फायदा-तोटा होईल, तो शेतकऱ्याचा होईल, छगन भुजबळांचे मत
Nashik Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लासलगावला विंचूर उपबाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नाशिक : 'कांद्याच्या निर्यातीवर (Onion Export) बंधने आणूच नका, जो काही फायदा होईल, तो शेतकऱ्याचा होईल किंवा जे नुकसान होईल, ते शेतकऱ्याचे होईल. ज्या वेळेस कांद्याचे भाव पडतात, त्यावेळेस पाच पैसे द्यायला सरकार येत नाही.. अन् ज्या वेळेस पैसे भेटायला लागतात, त्यावेळी मात्र काहीतरी आडकाठी आणतात, असे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.
गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न (Onion Issue) चांगलाच पेटला असून सुटता सुटेनासा झाला आहे. आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनी देखील लासलगावला (Lasalgaon) शेतकऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. छगन भुजबळ यांनी विंचूर उपबाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, कांद्याचा भाव वाढला की वांदे होतातच, वर्षातून एकदा कांद्याचा प्रश्न पुढे येतोच. केवळ कांद्याचेच नाहीतर सर्वच गोष्टींचे भाव वाढले. माझं तर म्हणणं कांद्याची निर्यातीवर बंधने आणुच नका, जो काही फायदा होईल, तो शेतकऱ्याचा होईल किंवा जे नुकसान होईल ते शेतकऱ्याचे होईल. ज्या वेळेस कांद्याचे भाव पडतात, त्यावेळेस पाच पैसे द्यायला सरकार येत नाही..अन् ज्या वेळेस पैसे भेटायला लागतात, त्यावेळी मात्र काहीतरी आडकाठी आणतात. मी केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्याशी याविषयी बोललो, त्यांनी नाफेडचे केंद्र वाढवून देण्याचे सांगितले आहे..
नाशिकच्या लासलगाव (Lasalgaon) बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर उपबाजार समितीत कांद्यावरील निर्यात मूल्य व नाफेड संबधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या भुजबळांनी माध्यमांना उलट प्रश्न केला. कांद्यासह बाजारात अनेक वस्तूंचे भाव वाढतात, तेव्हा मीडिया का दाखवत नाही, मात्र 'कांदा' विषय आल्यावर मीडिया पुढे असते, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वच मंत्री हे केंद्र सरकारशी निर्यात मूल्य कमी करा, याविषयी संवाद साधत आहे, मात्र निर्यात मुल्याविषयी अजूनही केंद्र सरकार निर्णय घेत नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी मात्र सावरासावर करत नाफेडची कांदा खरेदी त्यामुळेच सुरू असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. यासोबतच नाशिक (Nashik District) जिल्ह्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी केली असून ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरवा केला असून कांद्यासाठी 350 रूपये प्रति क्विंटल अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 865 कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून ते दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यापैकी 465 कोटी अनुदान वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यात 60 टक्के जिल्ह्यातील शेतकरी असून 435 कोटी रूपये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.