Nashik: अचानक तापमान बदलले; नाशिकममध्ये तापाची साथ, डेंग्यूचे रुग्णही शंभरीपार, पालिका अलर्ट मोडवर
Nashik News: शहरात तापाची साथ पसरल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, बदलत्या हवामानामुळे डेंग्यूसोबत मलेरियाचे रुग्णही वाढण्याची शक्यता आहे.

Nashik: कोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात सध्या उष्णतेचे तीव्र चटके जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात तापमान सरासरी 31 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मात्र, सध्या तापमानाने थेट 40 अंशांचा टप्पा गाठला आहे. या तीव्र उकाड्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. शहरात तापसदृश्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 1609 रुग्ण नोंदवले गेल्यानं आता नाशिक महापालिका अलर्टमोडवर आली आहे. (Nashik)
नाशकात तापाची साथ वाढतेय..
नाशिक जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढले असून नाशिक महापालिका व जिल्हा रुग्णालयातील एकूण डेंग्यूची रुग्णसंख्या 105 वर गेली आहे. ही संख्या पावसाळ्यापूर्वीच शंभरी पार गेली असल्याने हे चिंताजनक मानले जात आहे. परिणामी, नाशिक महापालिका आरोग्य विभाग अलर्ट मोडवर गेला असून सर्व रुग्णालयांमध्ये दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या विविध रुग्णालयांच्या बाहेर तापसदृश्य आजाराने त्रस्त रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे शहरात तापाची साथ पसरल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, बदलत्या हवामानामुळे डेंग्यूसोबत मलेरियाचे रुग्णही वाढण्याची शक्यता आहे.
महापालिका अलर्टमोडवर
महापालिकेच्या साथरोग विभागाचे डॉ. नितीन रावते यांनी सांगितले की, "सध्या डेंग्यू आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे साठे स्वच्छ ठेवावेत, डास उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ताप, अंगदुखी, थकवा अशा लक्षणांची वेळेत नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा." असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिका शहरातील तापाच्या वाढत्या रुग्णांमुळे अलर्टमोडवर आली आहे. पावसाळ्याआधीच ही साथ वाढल्यामुळे नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
शहरात तापमानवाढीने आरोग्यावर होतोय परिणाम
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तापमानाचा उच्चांक पहायला मिळत आहे. दरम्यान नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक वैतागले आहेत. एकीकडे उन्हाचा दाह वाढला असताना उष्माघाताने अनेक नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे शहरात डेंग्यू, तापाचे रुग्ण वाढत असल्याने नाशिककरांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. बदलत्या हवामानामुळे नाशिकच्या नागरिकांना मलेरियाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा:


















