(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नारायण राणेंना डिवचण्याची खेळी की धसका? शिवसेनेच्या 'या' निर्णयामुळे चर्चांना उधाण
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि नारायण राणे यांचा दौरा एकाच दिवशी आहे. त्यामुळे राणे यांच्या दौऱ्यात एकही अधिकारी नसणार आहे. नारायण राणेंना डिवचण्याची खेळी की धसका, असा प्रश्न उपस्थित होतोय.
रत्नागिरी : सध्या राज्यातील चार केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्र काढत आहेत. पण, या सर्वांमध्ये चर्चेत आणि केंद्र स्थानी असलेली यात्रा म्हणजे नारायण राणे यांची. नारायण राणे थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे देखील या यात्रेकडे एका विशेष अर्थानं पाहिलं जात आहे. त्यात आगामी मुंबई पालिका निवडणुकीची जबाबदारी नारायण राणेंना दिल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. या साऱ्या गोष्टी पाहता नारायण राणे यांच्या यात्रेकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे. नारायण राणे 23 आणि 24 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. यावेळी ते चिपळूण येथे देखील भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या निर्णयानं एका वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. 24 ऑगस्ट रोजी राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. नेमके त्याच दिवशी नारायण राणे रत्नागिरी शहरात असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात एकही अधिकारी हजर राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी राणे चिपळूण येथे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी नारायण राणे संगमेश्वर असा दौरा करत रत्नागिरी येथे दाखल होतील. पण, त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. दरम्यान, यानंतर आता नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे का? तसेच शिवसेनेनं नारायण राणे यांच्या दौऱ्याचा धसका तर घेतला नाही ना? अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे.
राजकीय नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया?
जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि राणेंचा दौरा याबाबत अद्याप तरी कोणत्याही नेत्यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शिवाय, त्यासंदर्भात ट्वीट देखील कुणी केलेलं नाही. पण, दोनच दिवसांपूर्वी 'नारायण राणे यांचा धसका घेण्याची काहीही गरज नाही. यापूर्वी जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे' अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे दिलेली आहे. शिवाय, सिंधुदुर्ग येथे बोलताना देखील राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाला भेट देणार यावरून निशाणा साधला आहे. पण, सध्या सर्व काही शांत असलं तरी याबाबत राजकीय प्रतिक्रिया येणारच नाहीत ही बाब नाकारता येणार नाही.
'मुख्यमंत्री गेला उडत'
पूरस्थितीची पाहणी करायला नारायण राणे चिपळूण येथे देखील आले होते. यावेळी अधिकारी गैरहजर असल्यानं नारायण राणे यांचा पारा चांगलाच चढला होता. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्याला जाब देखील विचारला होता. दरम्यान, अधिकाऱ्यानं दिलेल्या उत्तरावरून 'मुंख्यमंत्री गेला उडत' अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती. हे सारं कॅमेऱ्यात देखील कैद झालं होतं.
राणेंच्या दौऱ्याला का आहे महत्व?
मुंबईच्या पालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोन निश्चित होऊ शकतो असं भाजपला वाटतं. तसेच मुंबई किंवा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशा वेळी कोकणात राणेंसारख्या आक्रमक नेत्याला शिवसेनेच्या विरोधात मैदानात उतरवल्यास त्याचा राजकीय फायदा होईल असा देखील भाजपचा कयास आहे. कारण, कोकणात भाजपची ताकद तुलनेनं खूपच कमी आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.
मुंख्यमंत्र्यांच्या सावधानतेचा इशारा
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण. तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही. त्यामुळे गर्दी करू नका. नियम पाळा अशा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर देखील अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं, वरळी येथील नियोजित सभा रद्द