Nanded News : रावसाहेब दानवेंकडून नांदेडच्या पराभवाचं अॅनालिसिस, पण गाजावाजा करुन भाजपमध्ये आणलेल्या अशोक चव्हाणांची बैठकीला गैरहजेरी
Nanded News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर आले आहेत.
Nanded News नांदेड : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर आले आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी ते आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेत आहेत. थोड्या वेळापुर्वीच या बैठकीला सुरूवात झाली आहे. मात्र या बैठकीस माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गैरहजर असून ते काल रात्रीच मुंबई येथे गेले आहेत. चव्हाणांच्या अनुपस्थितिमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
रावसाहेब दानवेंकडून नांदेडच्या पराभवाचं अॅनालिसिस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मुख्यमंत्रिपद देऊनही अशोक चव्हाणांनी ऐन निवडणुकीत बदलेला पक्ष या सर्व बाबींमुळे नांदेड मतदारसंघात नाराजी पसरल्याचे बोलले गेले. त्यामुळे प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र असूनही नांदेडमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या विजयासाठी भाजपच्या दिग्गजांनी सभा घेतल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही बड्या नेत्यांनी चव्हाण यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. पण मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदमवारीमुळे मतांची गणितं बदलतील असे बोलले जात होते. मात्र, या जागेवर आता वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत. ते 59 हजार 442 मतांच्या फरकाने विजयी झालेत.
अशोक चव्हाणांची बैठकीला गैरहजेरी
या पराभवाची कारणे शोधून काढण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक आणि माजी मंत्री रावसाहेब दानवेंकडून नांदेडच्या पराभवाचं अॅनालिसिस करण्यात येत आहे. यासाठी आज जिल्ह्यातील भापचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगानेही जिल्ह्यात मोर्चे बांधणी केली जात आहे. मात्र, मात्र या बैठकीस माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे गैरहजर असल्याने अनेक तर्क वितर्क आणि विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या