(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नांदेड जिल्ह्याच्या सोमय मुंडेंचा देशभर डंका; गडचिरोलीत घातले 26 नक्षलींना कंठस्नान
नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या सोमय मुंडेंचा देशभर डंका, गडचिरोली येथे धाडसी कार्यवाही करत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलींचा खात्मा केला.
नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आणि एका डॉक्टर दांपत्याचा मुलगा असलेल्या IPS अधिकारी सोमय मुंडे यांनी शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत, धाडसी कार्यवाही करत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 जणांना कंठस्नान घातलं.
एवढी मोठी धाडसी कार्यवाही करून देशाची व राज्याची मान उंचावणारे सोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवाशी आहेत. वय फक्त 31 वर्षे असणारे सोमय विनायक मुंडे यांना बालपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं होतं. IPS अधिकारी असणाऱ्या सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटी आहे. सोमय यांचे प्राथमिक शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कुल या ठिकाणी झालं आहे. तर माध्यमिक शिक्षण-सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज, देहराडून या ठिकाणी झालं आहे. सोमय यांनी आयआयटी व एमटेक ही पदवी मुंबईहून घेतली. सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी आहेत.
सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टींग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणची आहे. त्यानंतर ASP अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे व आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिसनल एसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कार्यवाही केल्या आहेत. ज्यात मार्च 2021 छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत एन्काऊंटर कार्यवाही करून शस्त्र हस्तगत केले होते. तर जून 2021 रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत 13 नक्षलींना कंठस्नास घातले होते.
आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर येथील डॉक्टर दांपत्य डॉ. मुक्ता विनायक मुंडे व डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. वडील विनायक मुंडे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सनगाव येथील मूळ रहिवाशी असून गेल्या चाळीस वर्षापासून देगलूर येथे स्थायिक आहेत. डॉ. विनायक मुंडे हे जनरल सर्जन तर आई डॉ. मुक्ता ह्या स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांना दोन मुले असून सोमय हे थोरले असून मुलगी सुमंता ह्या कॉम्प्युटर सायन्स करतायेत.
संबंधित बातम्या :
- Gadchiroli Naxal: गडचिरोलीत पोलीस चकमकीत कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु, गृहमंत्र्यांकडून कौतुक
- Gadchiroli : तेलतुंबडेच्या खात्म्याने नक्षली चळवळीला मोठा धक्का: डीआयजी संदीप पाटील
- नक्षल्यांना मोठा दणका! लाखोंचा इनाम असलेले मोस्ट वॉन्टेड नक्षली ठार, जाणून घ्या कुणावर किती बक्षीस