Nana Patole : माझ्याकडून चूक झाली असेल तर पोलिसांनी कारवाई करावी : नाना पटोले
"भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडले आहे. पकडलेल्या मोदींविरोधात जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत आहेत. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने माझ्या अटकेची भाषा करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली
Nana Patole : भाजपने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. पंतप्रधान पदाभोवती असलेलं राजकारण भाजप गल्लीत आणू पाहत आहे. गुंडाचं टोपन नाव मोदी आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर विमानतळावर नाना पटोले यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. नाना पटोले यावेळी म्हणाले, "भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडले आहे. पकडलेल्या मोदींविरोधात जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत आहेत. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने माझ्या अटकेची भाषा करत आहेत. त्यापेक्षा देशाला लुटून पळालेल्या नीरव मोदी आणि ललीत मोदींवर कारवाई करा, असे आव्हान नाना पटोले यांनी यावेळी केले.
नाना पटोले म्हणाले, "पंतप्रधानांचा आम्ही नेहमीच सन्मान करत आहोत. लोकांचं गार्हाणं एकून मी हे वक्तव्य केलं. परंतु, भाजपने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. पोलिसांनी पकडलेल्या गावगुंड मोदींनी माझ्याविरोधात प्रचार केला, मला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला."
काय म्हणाले होते नाना पटोले?
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. याा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या