Nitin Gadkari on Nana Patole : नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करा : नितीन गडकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकणी नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना अटक करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता देशभरात वाद पेटलेला आहे. भाजपकडून या वक्तव्याचा निषेध होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक करावी, अशी विनंती नितीन गडकरी यांनी केली आहे. नाना पटोले यांनी वापरलेली भाषा निंदनीय असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाना पटोलेंच्या वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे भंडारा गोंदियाचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनीही नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार घेतली असून चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र आज सकाळपर्यंत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कोर्टात धाव घेऊ असे सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
महत्त्वाच्या बातम्या:
- नाना पटोले यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, भाजप आक्रमक
- ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला