नागपुरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, देशभरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा म्होरक्या अटकेत
Nagpur News Update : गेल्या आठवड्यात नागपुरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील म्होरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा म्होरक्या देशभरात अंमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur News Update : 2 आणि 3 मार्चच्या रात्री नागपुरात पकडण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून मुंबईला आणि त्यानंतर नागपुरात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी देशभरात अंमली पदार्थाच्या पुरवठा रॅकेटचा म्होरक्या संदीप तिवारीला वाराणसीमधून तर पंकज चरडे आणि अक्रम खड्डे या दोन आरोपींना गोव्यातून अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासानंतर समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे संदीप तिवारी यापूर्वी मुंबईत घडलेल्या 1 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये देखील आरोपी होता. संदीप तिवारी स्वतः फार्मासीस्ट आहे. तोच जौनपूर जवळ एका ठिकाणी हे सिंथेटिक ड्रग्ज तयार करत असल्याची माहिती नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाराणसी, गोवा, मुंबई आणि नागपुरात झाडाझडती घेतली असून देशभर ड्रग्जची वाहतूक करणारी गाडी मुंबईतून जप्त केली आहे. पोलिसांनी 3 मार्चच्या पहाटे जप्त केलेले दोन किलो एमडी ड्रग्ज नागपूर आणि विदर्भात होळीच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
2 मार्च रात्री नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला खबऱ्यांकडून शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ‘एम.डी.’चा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर सापळा रचला. पोलिसांनी दुचाकीवरून येणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोपेडची तपासणी केली. त्यावेळी चार झिपलॉक पाकिटांमध्ये 1.911 किलो ‘एमडी’ आढळले. पोलिसांनी लगेच कुणाल गोविंद गभणे (वय, 18, प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर) आणि गौरव संजय कालेश्वरराव (22, प्रेमनगर, शांतीनगर) या आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे तीन मोबाईल, रोख पाच हजार रुपये रोख, दुचाकी असा एकूण 1 कोटी 91 लाख 86 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
काय असते मेफेड्रोन पार्टीतील ड्रग्ज?
हे ड्रग्ज मिथाइलीनन डायऑक्सी, मथैमफेटामाईन आणि मेफेड्रोन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. प्रत्येक देशात याची वेगवेगळी नावे आहेत. हे ड्रग्ज नाकातून किंवा पाण्यातून घेतले जाते. या ड्रग्जच्या एक ग्रॅमची किंमत तब्बल 25 हजार रुपये इतकी आहे. नशा करणाऱ्यांत या ड्रग्जची वेगवेगळी नावेही आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूपर्यंत नशा जातो आणि धुंदी येते. परंतु सतत हे घेतल्यानंतर जीवाला धोका होण्याचीही शक्यता असते.
महत्वाच्या बातम्या