RTMNU : 'सिनेट'साठी 83.68 टक्के मतदान, अनेक उमेदवारांची वाढली चिंता; उद्या मतमोजणी
मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. कमी मतदान झाल्याने पराजय सहन करावी लागण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. कालपर्यंत आपला विजय निश्चित मानणाऱ्या उमेदवारांचीही चिंता वाढली आहे.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) पदवीधर मतदारसंघ वगळता विद्वत परिषद, अध्ययन मंडळ (BOS) सिनेटच्या रविवारी (20 नोव्हेंबर) निवडणुका शांततापूर्ण पार पडल्या. निवडणुकीत शिक्षक, प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारांपैकी 83.68 टक्के मतदारांनी मतदान केले.
मिळालेल्या माहितीनुसार सिनेटच्या प्राचार्य निर्वाचन क्षेत्राचे सर्वाधिक म्हणजेच 96.71 टक्के मतदान झाले. याशिवाय विद्वत परिषदेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी निर्वाचन क्षेत्राचे 94 टक्के मतदान झाले. विद्वत परिषदेच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्रासाठी 82.29 टक्के आणि प्राचार्य निर्वाचन क्षेत्रात 82.24 टक्के मतदान झाले. सिनेटच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्राचे 81.73 टक्के मतदान झाले. यासह 17 अध्ययन मंडळ निर्वाचन क्षेत्रात 94.65 टक्के मतदान झाले. विद्यापीठाचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी मतदान शांततापूर्ण झाल्याचे सांगितले. कोणत्याही मतदान केंद्रावर गोंधळ किंवा गैरप्रकार झाल्याची तक्रार आली नाही. मतदानासाठी विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व क्षेत्रांत एकूण 95 मतदान केंद्र तयार केले होते. रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान चालले. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत मतपेट्या पोहोचतील. मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरु होईल.
निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून उमेदवार आणि संघटनांचे पदाधिकारी सक्रिय होते. मात्र, सिनेट व विद्वत परिषदेच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्रात गेल्या वेळीपेक्षा यावेळी कमी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत सिनेट व विद्वत परिषद निवडणुकीत 90 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. कमी मतदान झाल्याने पराजय सहन करावी लागण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. कालपर्यंत आपला विजय निश्चित मानणाऱ्या उमेदवारांचीही चिंता वाढली आहे.
अनेकांबद्दल उघड नाराजी...
- शिक्षक मतदारसंघात अनेक प्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. तसेच समस्या सोडवण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नसल्याचे तक्रार अनेक मतदारांनी केली.
- याशिवाय अनेक शिक्षकांनी मतदान प्रक्रियेत याच नाराजीमुळे भाग घेण्यास नकार दिला असल्याचे कळते.
- सकाळपासून उमेदवार आणि संघटनांच्या पदाधिकारी शिक्षकांना मतदानासाठी संपर्क करत होते.
- शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने यंदा अनेकांचे गणित बिघडणार असल्याची चर्चा आहे.
ही बातमी देखील वाचा