एक्स्प्लोर
धर्मापलिकडचं लग्न...मुस्लीम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलीचं कन्यादान!
धर्म.. जात...याचा पगडा आपल्या समाजावर वर्षानुवर्षे आहे. मात्र यापलिकडे जाऊनही काही जण माणूसकी जपतात. असंच एक उदाहरण नागपुरात पाहायला मिळालं. दत्तक घेतलेल्या मुलीचं मुस्लीम बापाने कन्यादान केलं आहे.
नागपूर : मुलगी सुषमा चाचेरे आणि सुषमाचे अब्बू अहफाज अहमद.. वेगवेगळ्या धर्माची नावं ऐकून कदाचित गोंधळ उडू शकतो. पण बाप-लेकीचं हे अनोखं नातं नागपूर जिल्ह्यात सध्या कौतुकाचा विषय ठरतं आहे.
कारण आपल्या मानलेल्या मुलीच्या कन्यादानासाठी या बापाने धर्माच्या भिंती सहज ओलांडल्या आणि हिंदू रितीरिवाजांनुसार सुषमाचं लग्न थाटामाटात लावून दिलं. अहफाज अहमद हे नागपूरमधील कामठी नगरपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत.
इस्लाम सांगतो नातेवाईकांपेक्षा आपले शेजारी जास्त साथ देतात. 18 वर्षापूर्वी अहफाज अहमद यांची 11 वर्षीय मुलगी ब्रेन ट्युमरने दगावली. आठवणी पाठ सोडत नव्हत्या म्हणून अहफाज नव्या ठिकाणी स्थायिक झाले.
शेजारच्याच चाचेरे कुटुंबातली लहानगी सुषमा त्यांनी आपल्या कुशीत घेतली. जेवढे सुषमाला आई-वडील प्रिय त्याहून जास्त माया ती अम्मी-अब्बूवर. तिच्या अम्मी अब्बूंनीही तिला कशाचीच कमतरता भासू दिली नाही.
वयात आल्यावर घरी लग्नाची चर्चा सुरू झाली. माझं एका मुलावर प्रेम आहे असं मी घरी सांगितलं. यानंतर माझ्या लग्नाची पूर्ण जबाबदारी अब्बूंनी घेतली, असं सुषमाने सांगितलं. अहमद यांनी वडील म्हणून कर्तव्य बजावत सुषमाचे हिंदू धर्मात संपूर्ण विधीवत लग्नच लावलं नाही तर तिचं कन्यादानही केलं.
थाटामाटात लग्न पडले. विशेष म्हणजे या लग्नाला नातेवाईकांनी स्वीकारलं आणि पाठिंबाही दिला. पण आता आईवडिलांइतकिच तिची कमतरता अब्बू अम्मीलाही जाणवत आहे.
मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल आणि हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल गैरसमजच जास्त आहेत. एकमेकांना समजून न घेता, एकमेकांच्या सोबतीचा अनुभव न घेता हे गैरसमज प्रबळ झाल्याचं सुषमा सांगते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement