Mahavikas Aghadi Vajramooth Sabha : पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं नागपूरमधून गेलेत, त्याच्या सीबीआय चौकशीचं काय झालं? नाना पटोलेंचा सवाल
Nagpur Mahavikas Aghadi Vajramooth Sabha: पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटकं नागपूरमधील होते, त्याच्या सीबीआय तपासाचं काय झालं, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
Nagpur Mahavikas Aghadi Vajramooth Sabha: भाजप आणि आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांकडून राज्यात काॅमेडी शो सुरु असल्याचा बोचरा वार नाना पटोले यांनी केला. संभाजीनगरमधील दोन गटांच्या वादात पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, नागपुरातील सभेच्या जागेचा वाद निर्माण करण्यात आला. भाजप का घाबरतं? अशी विचारणा त्यांनी केली. देशातील महागडे शहर नागपूर असल्याचे ते म्हणाले. जे काही आणलं आहे ते सगळं कर्जातून आणलं आहे. जनतेच्या खिशातून पैसे लुटले जात आहेत. नागपूरकरांना लुटलं जातं आहे. पिण्याचे पाणी दिलं जात नाही. नागपुरात भयावह परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. एक प्रकारे लुटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं नागपूरमधून गेलेत, त्याच्या सीबीआय चौकशीचं काय झालं? अशी विचारणाही त्यांनी केली. त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. ते पुढे म्हणाले की, राज्यात अवकाळीने नुकसान झालं आहे आणि राज्यात मुख्यमंत्र्यांचा काॅमेडी शो सुरु असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांना काही देणघेणं नसल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेत असताना भरीव मदत केली. एका पैशाची मदत नसल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जाहिरातीवर 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, एकंदरीत भयंकर परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
या वज्रमूठीची भीती वाटते, सत्ता पुन्हा दिसणार नाही याची भीती वाटते
पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना अदानी मुद्दा उपस्थित करत पीएम मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे त्यानी सांगितले. ते कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. विस्फोटक बातम्या येत आहेत, अदानी समूहाकडून सांगूनही हिंडेनबर्गवर मानहानीचा दावा ठोकला नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नागपूरचा संदेश देशात जातो. विदर्भाने इंदिरा गांधींना सुद्धा पाठिंबा दिला होता. 10 महिन्यात काय दिवे लावले? असा जनतेचा सवाल असल्याचे ते म्हणाले. विदर्भात कोणते प्रकल्प आणले? अशी विचारणा त्यांनी केली. या वज्रमूठीची भीती वाटते, सत्ता पुन्ही दिसणार नाही याची भीती वाटते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
माझ्यावरील 100 कोटींचा आरोप खोटा : अनिल देशमुख
आमदार अनिल देशमुख यांनी संभाजीनगरची विराट सभा पाहून पायाखालची वाळू सरकल्याने नागपुरातील सभेला विरोध झाल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. राज्यात अवकाळी होऊनही शेतकऱ्यांना मदत नसल्याचे त्यांनी सांगितले. पिकांचे नुकसान होऊनही मदत झाली नसल्याचे ते म्हणाले. राज्यात उद्योगधंदे येत नसल्याचे ते म्हणाले. माझ्यावरील 100 कोटींचा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले. 14 महिने जेलचा भत्ता खाऊन बाहेर आलो असल्याचेही ते म्हणाले.