"मला खूप मारलं", आरोपींना कडक शिक्षा करण्याची 'दामिनी'ची विनंती
मला खूप मारलं, खूप त्रास होत आहे, आरोपींना कडक शिक्षा द्या, असं शुद्धीत येताच नागपूरच्या 'दामिनी'नं पहिले उद्गार काढले आहेत. 14 ऑगस्टला अत्याचाराच्या घटनेनंतर नागपूरची तरुणी आज पहिल्यांदा शुद्धीत आली.
नागपूर : मला खूप मारलं, खूप त्रास होत आहे, आरोपींना कडक शिक्षा द्या, असं शुद्धीत येताच नागपूरच्या 'दामिनी'नं पहिले उद्गार काढले आहेत. 14 ऑगस्टला अत्याचाराच्या घटनेनंतर नागपूरची तरुणी आज पहिल्यांदा शुद्धीत आली. तेव्हा तिनं पोलिसांना ही विनंती केली आहे.
आयसीयूमधून आता 'दामिनी'ला जनरल वॉर्डला हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी दामिनीशी संवाद साधला. 'दामिनी' सध्या ठिक असल्याचं डॉक्टरांनीही सांगितलं आहे.
'दामिनी'ची प्रकृती सुधारत असली, तरी मानसिकरित्या ती झालेल्या अत्याचारातून अजूनही सावरली नाही. तिच्या तोंडाचा काही भाग आता खुला झाला आहे, त्यामुळे ती थोडं थोडं बोलू शकत आहे.
नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत असल्याने तिला आता सामान्य वॉर्डमध्ये आणलं आहे. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीला ती ओळखू शकते असंही तिने सांगितलं.
काय आहे प्रकरण? दोन आठवड्यांपूर्वी चार नराधमांनी 'दामिनी'वर बलात्काराचा प्रयत्न करून तिला गंभीररित्या जखमी केलं होतं. उमरेड तालुक्यातील वेस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या गोकुळ कोळसा खाणीत ही घटना घडली.
याठिकाणी महिलांना लघुशंकेसाठी योग्य जागा नसल्यामुळे ती तरुणी लघुशंकेसाठी परिसरातील झुडुपात गेली. त्यावेळी कोळसा खाणीत आलेल्या चार ट्रक चालकांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यांनी तरुणीच्या डोक्यावर जड दगडांनी जोरदार वार केले. त्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयात जाऊन तरुणीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.