Nagpur Crime: पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी मुख्याध्यापिकेसह पर्यवेक्षिकेने मागितली लाच; एसीबीकडून अटकेची कारवाई
Nagpur: नुकत्याच मुलांच्या शाळा सुरू झाल्या असून प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाल्या आहेत. अशातच पाचवीत अॅडमिशन घेण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि पर्यवेक्षिकेवर एसीबीने कारवाई केली आहे.
Nagpur News: नागपूरच्या महात्मा गांधी सिंधू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (17 जून) धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील पर्यवेक्षिकेने आणि मुख्याध्यापिकेने पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी पालकांकडे लाच मागितली आहे. शाळेतील पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी पाचवी ते दहावी वर्गासाठीच्या मुख्याध्यापिकेशी बोलणी करून प्रवेश मिळवून देते, असे आमिष दाखवून पालकाकडून 9 हजार रुपये बळकावण्यात आले. पालकाकडून लाच घेतल्याप्रकरणी नागपुरातील त्याच शाळेतील पहिली ते चौथी, म्हणजेच प्राथमिक वर्गासाठीच्या मुख्याध्यापिका आणि पर्यवेक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीने अटक केली आहे.
अँटी करप्शन ब्युरोकडून (एसीबी) अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिकेचं नाव डायना अब्राहम (36 वर्ष) असून पर्यवेक्षिका रेखा मोहिते (62 वर्ष) यांनाही अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित शाळेत चौथ्या वर्गातील प्रवेशासाठी आरोपींनी 9 हजार रुपयांची लाच मागितली होती. विनाअनुदानित तुकडीतून पाचव्या वर्गात अनुदानित तुकडीत विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठी दोन्ही आरोपींनी 9 हजार रुपयांची लाच मागितली होती. आम्ही पाचवी ते दहावी या वर्गाच्या मुख्याध्यापिकांशी बोलून तुमच्या मुलाचा प्रवेश करून देऊ, असे त्या दोघांनी पालकांना सांगितले होते.
संबंधित पालकाने यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानंतर शनिवारी (17 जून) सकाळी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने शाळेत कारवाई करून दोघींना लाच मागितल्याचे पैसे स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
नाशिकमध्येही घडला होता असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhanagar) यांना लाच घेताना अटक करण्यात आली आणि यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई करत एसीबीने धनगर यांच्या घरातून कोटींचे घबाड बाहेर काढल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यातच नागरिकांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली. दरम्यान सुनीता धनगर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शासन निर्णयानुसार पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत 48 तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास सरकारी सेवेतील व्यक्तींना शिक्षण निलंबित केले जाते. त्यानुसार लाचखोर सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे.
शाळांकडून पालकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता झालेली शुल्कवाढ, शिक्षकांची प्रलंबित देयके, शालार्थ संकेतांक शासकीय योजनांचा लाभ यासाठी महापालिका प्रशासनाधिकारी धनगर नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्या वादग्रस्त कारभाराविषयी उपसंचालक कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर धनगर यांच्या घराच्या झाडाझडतीत 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने हस्तगत करण्यात आले. कोट्यवधींची स्थावर मालमत्ताही सापडली.
हेही वाचा:
Anil Jaisinghani : अनिल जयसिंघानीला ईडीचा दणका! 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI