Nagpur News : चतुर्थीलाच विघ्न! नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत नदी पात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nagpur News नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत नदी पात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृत मुलांची नावे आहे. ते दोघेही ८व्या वर्गात शिकत होते. काल शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत हे दोघेही पोहायला गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मुलगा खोल पाण्यात बुडायला लागला. तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्रही त्यात वाहवत गेला आणि बुडाला. गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने हे दोघे पाण्यात पोहायला गेले होते. मात्र हे नसतं साहस त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून गणेश चतुर्थीलाच या दोघांवर विघ्न आले आहे. राज्यभरात एकीकडे गणेश उत्सवाचा आनंद साजरा करत असताना या अपघातामुळे परिसरात मात्र शोककळा पसरली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ दोघेही बुडाले
मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी) गणेश चतुर्थीची शाळेला सुट्टी असल्याने महादूला गावाजवळील नदीत वृषभ आणि रोहन हे दोघेही पोहायला गेले होते. दरम्यान ते पाण्यात पोहत असताना त्यातील एकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मुलगा खोल पाण्यात बुडायला लागला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्रही खोल पाण्यात उतरला. मात्र त्याला त्यात यश आले आणि एका पाठोपाठ ते दोघेही त्यात बुडाले. काल उशिरापर्यंत शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडले नव्हते, मात्र आज सकाळपासून परत एकदा गोताखोर आणि SDRF पथकाकडून शोध मोहीम केली असता दोघांचे मृतदेह मिळून आले आहे.
दोन सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू
अशीच एक घटना शनिवारी गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना दोन सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय. नाल्याच्या पुलावर खेळत असताना तोल गेल्याने या दोन चिमुकल्यांचा त्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झालाय..
कुटुंबियांवर शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार हिरडामाली येथे पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो. त्या नाल्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहत असतं. देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोघे चिमुकले काल सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले. दरम्यान, पाण्यात खेळण्याचा मोह या चिमुकल्यांना आवरला नाही. यातच पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळता खेळता चिमुकल्यांचा पाय घसरल्याने दोघेही चिमुकले पाण्यात वाहून गेले.
रुद्र सुजित दुबे (वय 3 वर्ष ) आणि शिवम सुजित दुबे (वय 2 वर्ष) दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी मृतकांची नावे आहेत. काल रात्री गोरेगाव पोलिसात या संदर्भात वडील सुजित दुबे यांनी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही दोघे चिमुकले सापडले नाही. मात्र आज पुन्हा शोधकार्या सुरू असताना दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीच्या जवळ असलेल्या नाल्यात तरंगताना आढळले. घटनेची नोंद गोरेगाव पोलीसात करण्यात आली आहे. या घटनेने मात्र दुबे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा