(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवशी नियमबाह्य पद्धतीने महापालिकेतचं शुभेच्छांचा फलक!
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवशी काही महाभागांनी त्यांना शुभेच्छा देणारा फलक पालिकेच्या आवारात नियमबाह्य पद्धतीने लावला आहे. यामुळे शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेले मुंढे कोणावर कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवशीच काही महाभागांनी तुकाराम मुंढे यांना न आवडणारी कृती करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गोत्यात आणलंय. वाढदिवसाच्या निमित्ताने तुकराम मुंढे यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी काही महाभागांनी थेट त्यांच्या कार्यालयाच्या दारावरचं शुभेच्छांचा फलक लावला. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हा फलक पाहिल्यानंतर तत्काळ काढण्यास लावला. या घटनेबद्दल शिस्तप्रिय आणि कायद्याबद्दल आग्रही अधिकारी अशी प्रतिमा असलेले तुकाराम मुंढे या फलकासंदर्भात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुकाराम मुंढे यांचे कार्यालय नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर आहे. मुंढे त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कार्यालयात दाखल झाले. तेव्हा इमारतीच्या मुख्य पोर्चमध्ये जिथे त्यांची कार रोज थांबते, आणि मुंढे खाली उतरल्यावर ज्या ठिकाणी मुंढे यांची पहिली नजर जाते. नेमकं त्याच ठिकाणी एक भले मोठे फलक त्यांना दिसले. तुकाराम मुंढे यांच्या फोटोसह या फलकावर समस्त नागपूरवासियांच्याकडून तुकाराम मुंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा संदेश लिहिण्यात आला होता.
महापालिकेतचं कायद्याचा भंग
तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीतून कोरोना महामारीतून नागपूरकरांना वाचविले. पुढेही ते नागपूरकरांना वाचवत राहतील, असा विश्वास आम्हाला आहे. आम्ही नागपूरकर नागरिक तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे या फलकावर नमूद करण्यात आले होते. हे फलक पाहुन हा नियमांचा भंग असल्याने मुंढे यांनी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांना ते फलक लगेच काढण्याची सूचना केली. त्यांनतर ते फलक तिथून लगेच काढण्यात आले. विशेष म्हणजे महापालिका सार्वजनिक ठिकाणी अशा बेकायदेशीर फलकांवर कारवाई करते. शहराच्या विद्रुपीकरणासंदर्भात असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई ही केली जाते. मात्र, काही महाभागांनी थेट मनपा आयुक्तांच्या कार्यालयाच्या मुख्यद्वारावर हे फलक लावून महापालिकेच्या कार्यालयातच महपालिकेच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे आता या घटनेबद्दल शिस्तप्रिय आणि कायद्याबद्दल आग्रही अधिकारी अशी प्रतिमा असलेले तुकाराम मुंढे या फलकांसंदर्भात कोणती आणि कोणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एवढे मोठे फलक महापालिकेची सुरक्षा व्यवस्था भेदून तिथपर्यंत गेले कसे असा प्रश्नही या घटनेनंतर निर्माण झाला आहे. दरम्यान, हे फलक महापालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्याची युक्ती आहे, असे ही महापालिकेत दबक्या स्वरात सांगितले जात आहे. आयुक्तांना खुश करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी ही युक्ती केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिस्तप्रिय तुकाराम मुंढे अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई करतात का हेही पाहण्यासारखे असणार आहे. या विषयावर सध्या तरी महापालिकेत कोणतेही अधिकारी सध्या काहीही बोलायला तयार नाही.