मुंबईप्रमाणे पुणे मेट्रोचाही विस्तार होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत
पुणे मेट्रोच नाव बदलून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो अशा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आता पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी-कात्रज होणार आहे.
पुणे : मुंबईप्रमाणे पुणे मेट्रोचाही विस्तार होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे मेट्रोची आढावा बैठकी आज पार पडली यावेळी अजित पवारांनी पुणे मेट्रो विस्तारणार असल्याची घोषणा केली आहे. मेट्रोचे प्रस्तावित सहा कारिडॉर टप्प्याटप्प्याने सुरु करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचं काम एकत्र सुरू करण्याचे आणि डीपीआर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महामेट्रो, PMRDA, पुणे महानगरपालिका यांच्याशी संबंधित कामाचा आढावा घेतला आहे. यापुढे आठवड्यातून एकदा मी पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. अर्थमंत्री या नात्याने मेट्रोच्या कामाला तातडीने निधी कसा मिळेल असा प्रयत्न करणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली आहे. नव्याच्या नऊ दिवसांसारखी आजची बैठक नाही, हे मी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
निगडी ते कात्रज या मार्गावरील मेट्रोचं नाव बदलून पुणे पिंपरी-चिंचवड महा मेट्रो असं करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आता पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी-कात्रज होणार आहे. वनाज-रामवाडी मार्ग वाढवून चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर-हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर-माण असा वाढवणार आहे.
हडपसर-स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आला आहे. निगडी-चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेशही अजित पवारांनी दिली आहे. खडकवासला ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर या मार्गाचा विचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुण्यातील एचसीएमटीआर 24 मीटर ऐवजी 8 मीटर होणार आहे.
हायपरलूपचा प्रकल्प जगात कुठेही झालेला नाही. हा प्रकल्प आधी कुठे 10 किमी तर होऊ द्या, जर तिकडे यशस्वी झाला तर आपल्याकडे त्याची ट्रायल घेऊ, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प सध्यातरी शक्य नसल्याचे स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या