खासगी रुग्णालयासाठी सरकारकडून शुल्कदर निश्चित, रुग्णांची लूट थांबवण्यासाठी निर्णय
कोरोनाच्या लढाईत खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारनं केलं होतं. मात्र सहकार्याऐवजी रुग्णालयांकडून टाळाटाळ सुरु असल्याचं समोर आलं. म्हणून सरकारला हे कठोर पाऊल उचलावं लागलं आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयं रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र आता राज्य सरकारनं खासगी रुग्णालयांनाच इंजेक्शन देण्याचं ठरवलं आहे. कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी तसं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. तसंच रुग्णांची लूट थांबवण्यासाठी खासगी रुग्णालयांना शुल्कदर निश्चित करुन देण्यात आले आहे. कोरोनाच्या लढाईत खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारनं केलं होतं. मात्र सहकार्याऐवजी रुग्णालयांकडून टाळाटाळ सुरु असल्याचं समोर आलं. म्हणून सरकारला हे कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. 31 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे.
निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी 4000 रुपये आकारले जाणार आहे. तसंच व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी 7500 तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी 9000 रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने इतर 270 प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतं.
Corona Update | खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड सरकार ताब्यात घेणार, सरकारचं परिपत्रक
सरकारने ठरवलेल्या दरांमध्ये औषधे, डॉक्टर, परिचारिका यांची फी, जेवण आणि खाटेचे भाडे यांचा समावेश आहे. कोव्हिड चाचणी, पीपीई किट, एमआरआय, सीटी स्कॅन आणि काही महागड्या औषधांचे वेगळे पैसे आकारले जातील. यापूर्वी खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर वापरणाऱ्या कोव्हिड-19 च्या रुग्णांकडून 40 ते 50 हजार रुपये घेतले जात होते. नव्या दरांमुळे खर्च साधारणत: 82 टक्के खर्च कमी होणार आहे. पीपीई किट, पेसमेकर, इंट्राऑक्युलर लेन्स, स्टेंट, कॅथेटर, बलून, मेडिकल इंप्लांट यांचे दर प्रत्यक्ष किमतीच्या 10 टक्क्यांहून अधिक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक शस्त्रक्रियेचे कमाल दर ठरवण्यात आले आहेत.- अॅन्जिओग्राफी - 12 हजार
- अॅन्जिओप्लास्टी - 1.2 लाख
- नैसर्गिक प्रसूतीसाठी - 75 हजार
- सिझर प्रसुती - 86, 250
- डायलिसिस- 2500
- गुडघ्याची शस्त्रक्रिया- नी रिप्लेसमेंट - 1 लाख 60 हजार
- व्हॉल्व रिप्लेसमेंट- 3 लाख 23 हजार
- पर्मनंट पेसमेकर - 1 लाख 38 हजार
- मोतिबिंदू शस्त्रक्रिया- 25 हजार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
