(Source: ECI/ABP News/ABP Majha)
1 कोटी 7 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा; 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना थेट लाभ
माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हीत बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात.
मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा सध्या सर्वत्र गवगवा दिसत असून आज पुण्यातील बालेवाडी येथे जंगा कार्यक्रमात महिलांन या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या पहिल्या 2 हफ्त्यांची रक्कम 3000 रुपये जमा झाली आहे. सरकारने 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आज संध्याकाळपर्यंत 1 कोटी 7 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हीत बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा-अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. तर, पुढील 5 वर्षांसाठी ही योजना निश्चित सुरू होईल, महिला भगिनींना 5 वर्षांचे 90 हजार रुपये मिळतील, असा शब्दच अजित पवार यांनी बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला आहे.
दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. 1 कोटी 35 लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी 1 कोटी 3 लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यानंतर, सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत या योजनेच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी 7 लाख महिला भगिनींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत.
1 कोटी 7 लाख महिलांना मिळाला लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असून आज सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत 1 कोटी 7 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेचा पैसे जमा झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 3200 कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 34 लाख अर्ज प्रोसेस केले होते, त्यापैकी 26 हजार अर्ज आधारशी लिंक नाहीत. त्यामुळे त्यांना लाभ देताना अडचण निर्माण झाल्याचंही शासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.