MPSC : 40 लाखांत एमपीएससी परीक्षेत पास करण्याचं आमिष, भंडाऱ्यातील दोघांना अटक
MPSC Scam Viral Phone Recording : रविवारी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आपल्याकडे असण्याचा दावा करणारा एक ऑडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भंडारा : एमपीएससी परीक्षेमध्ये (MPSC) पैसे घेऊन पास करण्याचं आमिष दाखविणाऱ्या दोघांना भंडाऱ्यातून अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनुली या गावात पुणे आणि नागपूर क्राईम ब्रँचच्या पथकानं ही कारवाई केली. योगेश वाघमारे आणि दीपक साखरे असं क्राईम ब्रँचने अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. योगेश वाघमारे हा सोनुली येथील असून दीपक साखरे हा बालाघाटचा आहे.
एमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार करून पास करण्याचं आमिष दाखवून हा घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं. पुणे येथे गुन्हा दाखल असल्यानं पुणे क्राईम ब्रँचने नागपूर क्राईम ब्रँचच्या मदतीनं भंडाऱ्यात ही कारवाई केली. या कारवाईनं मोठी खळबळ उडाली असून आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पेपर फुटला नसल्याचं एमपीएससीकडून स्पष्टीकरण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यापूर्वीच आम्ही तुम्हाला पेपर देतो तुम्ही 40 लाख रुपये द्या, असा नागपूरमधील एका कन्सलटंसीने दावा केल्याचे फोन रेकॉर्डिंग समोर आले आहे. हे सगळे कॉल रेकॉर्डिंग एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एका कन्सलटंसीकडून असे फोन आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल्याने पुण्यातील स्पर्धा परीक्षा वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून कोणताही पेपर फुटलेला नाही, सगळे पेपर सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
व्हायरल कॉलमध्ये नेमकं काय आहे?
नमस्कार सर मी रोहन कन्सल्टंसी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल.
आपण गट ब च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे, आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एकही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल.
यात संबंधित विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा करत आहे. तर मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका, असे सांगितले जात असल्याचंही संबंधित व्यक्ती म्हणत आहे.
सध्या पुण्यात हा कॉल रेकॉर्डींग तुफान व्हायरल झालं असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

