MPSC : राज्यसेवेचा अंतिम निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला तर रुपाली मानेची मुलींमध्ये बाजी
MPSC Result : राज्यसेवेच्या परीक्षेचा आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर रुपाली माने मुलींमध्ये पहिली आली आहे.
गिरीश परेकर हा मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 4,5 आणि 6 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सदरचा निकाल हा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये एकूण 200 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 60/2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल/ शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/mLUdDGxTv0. https://t.co/CtYCgDOJA0. pic.twitter.com/UddPHWSIGj
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 31, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसिलदार अशा वर्ग 1 च्या पदांसाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला, 4,5 आणि 6 डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या यादीत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम आला आहे तर निलेश नेताजी कदम यानं दुसरा क्रमांक पटकावलं आहे. रुपाली माने हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मुलाखतीनंतर अवघ्या दोनच तासात लावली मेरिट लिस्ट
आज लागलेल्या राज्यसेवेच्या अंतिम निकालाची गुणवत्ता यादी या आधी 29 एप्रिल रोजी लावण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे मुलाखत झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये ही यादी लावण्यात आली होती. त्यावेळी एकूण दोनशे पदांसाठी 597 उमेदवारांची या निकालाच्या माध्यमातून निवड करण्यात आली होती. मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतींसाठी आयोगाकडून बोलावण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेतील गुणांची यादी लोकसेवा आयोगाकडून आधीच तयार ठेवण्यात आली होती. आज मुलाखती झाल्यानंतर मुलाखती घेणाऱ्या पॅनलकडून देण्यात आलेल्या गुणांची बेरीज मुख्य परीक्षेतील गुणांसोबत करण्यात आली आणि अवघ्या दोनच तासांमध्ये मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.