23 February Headlines: MPSC विद्यार्थी शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटणार, सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा तिसरा दिवस; आज दिवसभरात
Headlines Today: भाजप नेते किरीट सोमय्या हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर काय नवे आरोप करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केलेला नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचसंदर्भात विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. यासह आज दिवसभरात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या पाहूयात,
MPSC विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार
MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार आहे. MPSC च्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग लेखी स्वरुपात निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. मंगळवारी रात्री शरद पवारांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेण्यास पुढाकार घेऊ असे म्हटले होते. त्यानुसार शरद पवार यांच्यासह पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस
मागच्या दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस आहे. काल झालेल्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला.
किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर
भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडलेल्या किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरी ईडीने धाड टाकली होती. आजचा सोमय्यांचा दौरा त्या संदर्भातच आहे का याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर जाणार
राज्यातील 16 जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. काही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आजपासून संपावर जाणार आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना समान किमान कार्यक्रमांतर्गत भरीव स्वरूपाची मानधनवाढ करण्यात यावी यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी विविध प्रकारची आंदोलने करीत आहेत.
आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा 18 वा स्थापना दिवस
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा आज 18 वा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ कार्यक्रम आज पार पडत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस, राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दक्षता समारंभामध्ये हा कार्यक्रम, सकाळी 10 वाजता होणार आहे.