खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात पडताळणीबाबतचा निकाल 3 ते 4 दिवसात येण्याची शक्यता
सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात प्रमाणपत्रावरील तक्रारीची अंतिम सुनावणी आज पार पडली. सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे 3 ते 4 दिवसात या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात प्रमाणपत्रावरील तक्रारीची अंतिम सुनावणी आज पार पडली. सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे 3 ते 4 दिवसात या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात आज अंतिम सुनावणी पार पडली. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 व 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता.
सदर प्रकरणी तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुनी संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्त दक्षता समितीमार्फत चौकशी करण्यात यावी असा अर्ज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे वकील अॅड. संतोष नाव्हकर यांनी केला. मात्र जिल्हा जात पडताळणीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पुर्ण झाल्याचे कळविले.
दक्षता समितीचा अहवाल आम्हाला मान्य नसून याविरोधात आम्ही उच्च न्यायलयाचा दरवाजा ठोठवणार असल्याचे अॅड. संतोष नाव्हकर यांनी सांगितले. दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी खोटा दाखला सादर करुन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तर अॅड. संतोष नाव्हकर यांनी देखील खोटी कागदपत्र सादर करुन दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांचे वकीलपत्र रद्द करण्याची मागणी तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी केली.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी बेडा जंगम जातीचा दाखला सादर करत निवडणूक लढविली होती. मात्र जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असून त्यांनी बोगस जातीचा दाखला मिळवला असून त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.