Pune Crime : आई अन् आजीने मिळून 17 वर्षीय लेकीची घरातच केली प्रसुती; बाळ फेकून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार
लोकलाजेस्तव आई आणि आजीने मिळून 17 वर्षीय लेकीची घरातच केली प्रसुती करुन बाळ इमारतीच्या पार्किंगच्या कोपऱ्यात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे.
Pune Crime News : आई आणि आजीने मिळून 17 वर्षीय लेकीची घरातच केली प्रसुती (delivery)करुन बाळ इमारतीच्या पार्किंगच्या कोपऱ्यात टाकून दिल्याचा (Pune Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. हे बाळ दोन दिवसांचं होतं. या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय मुलगी आणि मुलगा या दोघांची मैत्री सोशल मीडियावरुन झाली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मुलगी अनैतिक प्रेमसंबंधातून गरोदर राहिली. त्यानंतर आई आणि आजीने तिची प्रसुती घरातच केली. आई पुण्यातील आयुर्वेदिक दवाखान्यात नर्स आहे. तिला यासंदर्भातील सगळी माहिती आहे. जुन्या काळात ज्या प्रकारे घरीच प्रसुती करण्यात येत होती. त्याच प्रक्रियेचा वापर करुन मुलीची घरीच प्रसुती केली आणि तिघींनी मिळून हे नको असलेलं बाळ पार्किंगमध्ये टाकून दिलं.
या संदर्भातील पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेतलं आणि ससून रुग्णालयात उचारासाठी पाठवलं. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना एका मुलीची घरीच प्रसुती झाली आहे आणि तिला रक्तस्त्राव होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोंढवे-धावडे या परिसरातील स्वामी समर्थ सोयायटीमध्ये मुलीची माहिती घेतली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर मुलीनेच अनैतिक प्रेमसंबंधातून गरोदर असल्याचं आणि घरीच प्रसुती केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुलगा विमान नगर परिसरात राहायला असून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणी दखल घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. सध्या बाळ आणि कुमारी माता उपचार घेत असून राज्य महिला आयोग यावर लक्ष देत आहे.पोलिसांना या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असताना ती तपासणीसाठी गेली असताना तिची माहिती डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे की नाही याची जबाबदारी निश्चित करून डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. जन्म दिलेले दोन दिवसीय नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून बाळाच्या तब्येतीवर आयोग लक्ष देत आहे, असं ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलं आहे.
पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये अल्पवयीन सतरा वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी1/3 pic.twitter.com/IpjuI9duwT
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 16, 2022