MNS Signature Campaign : 'एक सही संतापाची', राजकीय घडामोडींबाबत राग व्यक्त करण्यासाठी मनसेची राज्यभर स्वाक्षरी मोहीम
MNS Signature Campaign : राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींवर मनसेतर्फे सह्यांची मोहीम राबवली जात आहे. मनसेचं आज (8 जुलै) आणि उद्या (9 जुलै) 'एक सही संतापची' हे अभियान सुरु आहे.
MNS Signature Campaign : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) राज्यभरात आगळंवेगळं आंदोलन राबवलं जात आहे. राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींवर मनसेतर्फे सह्यांची मोहीम (Signature Campaign) राबवली जात आहे. मनसेचं आज (8 जुलै) आणि उद्या (9 जुलै) 'एक सही संतापची' (Ek Sahi Santapachi) हे अभियान सुरु आहे. या अभियानाद्वारे मनसेकडून राजकीय घडामोडींचा (Maharashtra Politics) निषेध करण्यात येत आहे. राज्यभरात मनसेने कुठे कुठे आंदोलन राबवलं हे जाणून घेऊया...
मुंबईत संदीप देशपांडे यांच्या नेतृत्त्वात मोहिमेला सुरुवात
राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा विरोधात मनसेने आज आंदोलन छेडले आहे. मनसेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे. मुंबईच्या दादर विभागात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेला मनसेचे नेते अमित ठाकरे, नितीन सरदेसाई देखील उपस्थित आहेत. त्यांनी स्वाक्षरी करुन या मोहिमेला सुरुवात केली आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांची राज्यातील राजकारणावरील भाषणे एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यात येत आहेत. तर एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर सामान्य नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राज्यातील या राजकारणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईत मनसेच्या वतीने एक सही संतापाची अभियान
नवी मुंबईतील वाशी आणि ऐरोली रेल्वे स्थानकावर आज मनसेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान राबवण्यात आले. राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेतर्फे ही सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत चालला असून राजकारणाप्रति नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने या सह्याच्या मोहिमेत सहभागी होत आपला संताप व्यक्त केला. मनसेच्या वतीने विभागवार अभियान राबवण्यात येणार आहे.
बुलढाण्यात 'एक सही संतापाची' मनसेचे अभियान
राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथ पाहता जनतेमध्ये संताप आणि रोष असल्याचे सांगत राजकारण्यांच्या बाबतीत जनतेमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही, आणि त्यामुळे मनात असलेला संताप स्वाक्षरींच्या माध्यमातून व्यक्त व्हावा आणि एकदा तरी जनतेने राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसेच्या वतीने "एक सही संतापाची" हे अभियान राबवले जात आहे.
गोंदियात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 'एक सही संतापाची' उपक्रम
महाराष्ट्र राज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी विरोधक देखील हात मिळवणी करत सत्ता स्थापन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात *राजकारणाचा चिखल झाला आहे का ? माझ्या मताला काही किंमत नाही का ?* असा सवाल उपस्थित करत एक सही संतापाची हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आज गोंदिया शहरातील नेहरु चौक इथे हा उपक्रम मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राबवण्यात आला.
मनसेच्या एक सही संतापाची मोहिमेला बारामतीत प्रतिसाद
राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांशी प्रतारणा करुन विश्वासघात केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभर एक सही संतापाची मोहीम राबवण्यात येत आहे. बारामतीत देखील ही मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी मनसेच्या या उपक्रमात सही करुन सरकार बद्दल संताप व्यक्त केला.
पुण्यातील चौकाचौकात फ्लेक्स उभारुन एक सही संतापाची मोहीम
राज्यात सुरु असलेल्या तोडफोडीच्या राजकारणावर व्यक्त होण्यासाठी मनसेकडून एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात येत आहे. पुणे शहरातील वेगवेगळ्या चौकांमधे त्यासाठी फ्लेक्स उभारण्यात आले असून त्यावर लोकांना त्यांची सही आणि प्रक्रिया लिहिण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मनसेच्या या आवाहनाला लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक सही संतापाची मोहीम
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडमोडींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपक्रम हाती घेतला आहे. मनसेतर्फे ठिकठिकाणी एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे. सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात देखील आज सकाळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भर चौकामध्ये मोठे फलक लावून त्यावर राजकारणाचा चिखल झालाय का? माझ्या मताला किंमत नाही का? मतदानाला गृहित धरणार का? अशा पद्धतीचे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नागरिक देखील या फलकावर सही करुन चाललेल्या राजकीय नाट्यविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत.
जळगावात पाच ठिकाणी 'एक सही संतापाची' स्वाक्षरी मोहीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आठ व नऊ जुलै रोजी एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीचा राजकारणाचा चिखल बघता सामान्य माणसाचे किती घोर फसवणूक होत आहे. ज्या व्यक्तीला मतदान केलं आज ती व्यक्ती कुठे आहे या सर्व गोष्टींचा संताप व्यक्त करण्याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव जिह्यात एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. काव्यरत्नावली चौक, नूतन मराठा कॉलेज चौक, नगरपालिका, अजिंठा चौफुली यासह शहरातील पाच ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना संताप व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. दिवसभरात नागरिकांसाठी या ठिकाणी स्वाक्षरी करण्यासाठी फलक लावण्यात आलेले आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्याचा राजकारणाचा चिखल बघता संतापणावर झाला असेल तर तो या फलकावर सही करुन तुमच्या संताप व्यक्त करा, अशी विनंती नागरिकांना मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने केले जात आहे.
VIDEO : MNS Signature Campaign: एक सही संतापाची ही मोहीम मनसेची नाही तर जनतेची- अमित ठाकरे