Nashik News : नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
Nashik News : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह.

Nashik News : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात (Dindori) जोरदार आवाजाचा हादरा बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिंडोरीसह आसपासच्या 25 किलोमीटर परिसरात हा आवाज ऐकू आला. आवाज इतका प्रचंड होता की, अनेक घरांच्या काचा फुटल्याच्या घटना देखील समोर आल्या. तर काही घरांना मोठा हादराही बसल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी आणि तहसीलदार यांच्याकडून नेमका आवाज कसला झाला, याचा शोध सुरू असून आता याबाबत पोलिसांनी (Police) महत्त्वाची माहिती दिली आहे.
आवाजाचं गूढ रहस्य
गडगडाट आणि हादऱ्यामुळे हा भूकंप किंवा विमान अपघात झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये झाली होती. मात्र, या गूढ आवाजाविषयी तपास करताना पोलीसांनी माहिती दिली की, हा आवाज नाशिकच्या ओझर येथे असलेल्या HAL (हिंदुस्थान अरोनॉटिक्स लिमिटेड) च्या लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई लढाऊ विमानांच्या सरावाचा होता.
या सरावादरम्यान सुखोई विमान जमिनीच्या अतिशय जवळून उडत गेले, ज्यामुळे प्रचंड आवाज झाला. आवाजाच्या दाबामुळे दिंडोरी भागात अनेक घरांच्या काच फुटल्या आणि काहींना हादराही बसला.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक?
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, झालेल्या घटनेसंदर्भात एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे.सुखोई विमानाचा सॉंनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जेव्हा सुखोई विमान प्रवास करते, त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज होतो. या आवाजाने तिथल्या आजूबाजूच्या वातावरणात भीती निर्माण होण्याची शक्यता असते, तसाच प्रकार दिंडोरीत घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठलीही दुर्घटना दिंडोरीच्या परिसरात झालेली नाही. विमान जवळून गेल्याने खूप मोठा आवाज झाला होता. याबाबतचा अधिक तपास आम्ही करत आहोत. मात्र, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















