उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीची बातमी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जिवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने गुरुवारी तेलंगणामध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

A flash flood has occurred at Chashoti area in Kishtwar: देशाच्या उत्तरेकडील भागात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीची बातमी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जिवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने गुरुवारी तेलंगणामध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी किश्तवारमध्ये ढगफुटीची बातमी पोस्ट केली. त्याच वेळी, उत्तर प्रदेश-मध्यप्रदेशसह 11 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि राजस्थान-बिहारसह 21 राज्यांमध्ये यलो अलर्ट आहे. दिल्लीत बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आज बारावीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि गैरसरकारी शाळा बंद राहतील.
किश्तवारमधील चोसीटी भागात ढगफुटी
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर पोस्ट करत माहिती दिली की, "जम्मू आणि काश्मीरचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांचा संदेश मिळाल्यानंतर किश्तवारचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी आत्ताच बोललो. चोसीटी भागात ढगफुटी झाली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तत्काळ कारवाई सुरू केली आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. आवश्यक बचाव आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली जात आहे. माझ्या कार्यालयाकडून नियमित अपडेट्स मिळत आहेत, सर्व शक्य ती मदत पुरवली जाईल."
राजौरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार
जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित राहण्याचा आणि नदीजवळ न जाण्याचा सल्ला देत अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
पुढील ३ तासांत अल्मोडा, बागेश्वर, चमोली, चंपावत, डेहराडून, नैनीताल, पौरी गढवाल, पिथोरागड, रुद्र प्रयाग, टिहरी गढवाल, उधम सिंह नगर, उत्तर काशी येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजयवाडामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली
विजयवाडामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. यादरम्यान, 51 वर्षीय व्यक्तीचा नाल्यात पडून मृत्यू झाला. गुलाम मोहिदीन स्ट्रीटजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू होते आणि परिसरात पाणी साचल्याने ती व्यक्ती त्यात पडली.
दिल्ली: कालकाजीमध्ये पावसामुळे झाड कोसळले
दिल्लीमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कालकाजी परिसरात एक झाड कोसळले. एक कार आणि एक बाईक त्याखाली आली. झाडाखाली गाडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























