शाईफेक प्रकरणानंतर राज ठाकरेंचं पत्र, म्हणाले, चंद्रकांत दादांनी माझ्या विनंतीचा मान ठेवला
Raj Thackeray : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून या प्रकरणी यशस्वी मध्यस्ती केल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिलीय.
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरील शाईफेक प्रकरणी झालेली कारवाई मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) पत्र लिहून चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. "चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावरील मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. त्यानंतर या सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन मी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत 307 चं कलम शिथिल करण्याची तयारी दाखलवली, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबत आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यांतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. या प्रकरणानंतर घटनास्थळी असलेल्या 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं. शिवाय शाई फेकणाऱ्या तिघांवर गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, आज चंद्रकांत पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणी नरमाईची भूमिका घेत शाई फेकणाऱ्यांसह कोणावरही कारवाई करून नका, माझी कोणाबाबतही तक्रार नाही, असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या नरमाईच्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
काय म्हटले आहे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात?
"लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण 'मनसे स्टाईल'ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण है करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधानं करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळं राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात. असाच प्रकार, राज्यातील विद्यमान मंत्री, भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत घडला.
एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एकच बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलिस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या 11 पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम 307 देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलिस बांधवांबद्दल.
पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यातच आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड परिसरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी, मला भेटून गेले आणि त्यांनी पोलिसांनी दाखल केलेली कलमं ही गंभीर आहेत अशी तक्रार केली. मुळात एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने निषेध नोंदवणं हे साफ बिनडोकपणाचं आहे, आणि माझ्या मते हा निषेध नाही तर तो स्टंट असतो. याची जाणीव मी त्या प्रतिनिधींना करून दिली. पण असो, निषेधकर्त्यांच्या वतीने या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की, मी या प्रकरणात मध्यस्थी करावी, कारण ही कलमं कायम राहिली तर या कार्यकर्त्यांचं आयुष्य उध्वस्त होईल. त्यामुळं मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो, त्यांच्या कानावर या सगळ्यांचं म्हणणं घातलं. त्यावर त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत 307 सारखं कलम शिथिल करण्याची तयारी दाखवली. तसंच माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरील निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तत्काळ होकार दिला. यासाठी दोघांचे मनापासून आभार, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ज्येष्ठ भाजप नेते श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका. pic.twitter.com/K2MrqeiLrc
— Raj Thackeray (@RajThackeray) December 12, 2022
महत्वाच्या बातम्या