Prakash Mahajan : अजित पवारांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, मिटकरी हल्ल्यातील कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक
मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू पावल्याची घटना घडलीय. या संपूर्ण प्रकाराला मिटकरी हेच जबाबदार असल्याचा दावा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलाय.
छत्रपती संभाजीनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केलेल्या एका वक्तव्याने राज्याचा राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. यात संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात (Akola News) राडा घालत अमोल मिटकरी चक्क गाडी फोडल्याची घटना घडली आहे. मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिसरा संशयित आरोपीलाही आता ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, कालच्या अकोल्यातील मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू पावल्याची दुदैवी घटना देखील घडली आहे. या संपूर्ण प्रकाराला अमोल मिटकरी हेच जबाबदार असल्याचा दावा मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला आहे.
.... तर आम्ही देखील आंदोलन करू
तर आम्ही फक्त मोदी यांना पाठिंबा दिलाय. अजित पवार यांना महायुतीमध्ये राहायचं नाही, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही देखील आंदोलन करू, असा थेट इशाराही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद आणखी टोकाला गेल्याचे दिसून येतंय. अमोल मिटकरी हे एका संविधानक पदावर आहेत. यांच्याकडे काय पुरावा आहे की राज ठाकरे सुपारीबाज आहे? गाडीवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन होणार नाही. मात्र, या संपूर्ण घटनेत आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. ही घटना का झाली, तर अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली. त्यातूनच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झालाय.
अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा- प्रकाश महाजन
सुपारीबाज अजित पवार आहेत. पंतप्रधान यांनी 70 हजार कोटींचा आरोप त्यांच्यावर या पूर्वी केलाय. गेल्या निवडणुकीत मनसे नेत्यांना त्यांनी मणावले. आम्ही काम केले नसते तर अजित पवार गटाचे तटकरे निवडूनही आले नसते. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यला जबाबदार असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करा, त्यात अजित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. अशी मागणीही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.
मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार
दरम्यान, कालच्या अकोल्यातील मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर हृदयविकाराने मरण पावलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जय याच्या निंबी मालोकार या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. जयच्या अंत्यसंस्कारासाठी प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकर आणि प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार उपस्थित राहणार आहेत.
अकोल्यातील कार्यकर्त्यांशी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे. पुढच्या काही दिवसांत अमित ठाकरे मालोकार कुटुंबियांच्या भेटीसाठी अकोल्यात येण्याचीही शक्यता आहे. सध्या जयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा रूग्णालयात आहे.
हे ही वाचा