(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari : मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या; 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Akola News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकारींवर केलेला हल्ला आणि गाडीची तोडफोड प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Amol Mitkari : अकोला : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) केलेला हल्ला आणि गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकोल्यातील (Akola News) सिव्हील लाईन पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश.
या प्रकरणातील हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यानंतर आता हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सर्व मनसे कार्यकर्ते फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या विरोधात मनसे आज चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना आज अकोल्यात घडलीय. दरम्यान, अमोल मिटकरींनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झालेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केल्याने अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या हल्ल्याला राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांनी राजकारणात चुकीचा पायंडा पाडला- वैभव खेडेकर
राजकीय जीवनात राजकीय मर्यादा पाळल्या पाहिजेत. सर्वांच्या बोलण्यावर मर्यादा असल्या पाहिजेत. अमोल मिटकरी हे सातत्यानं अर्वाच्च भाषेत किंवा खालच्या भाषेत टीका करीत आहेत. अमोल मिटकरी यांनी चुकीचा पायंडा राजकारणात पाडलेला आहे. यावर संतप्त होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडलेली आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं समर्थन करतो. अभिनंदन करतो की राजकीय व्यभिचारी करणाऱ्या अशा व्यक्तींना जशास तसं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय सभ्यता पाळली पाहिजे.
आमच्यावर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांनी अनेकदा हिंदू धर्मावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेक वेळा भाजपवरती खालच्या दर्जाची टीका केलेली आहे. आज हेच लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. यानंतर सुद्धा अमोल मिटकरी यांनी त्यांची भाषा आणि सभ्यता पाळावी, असा माझा आमदार अमोल मिटकरी यांना सल्ला आहे, अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी अमोल मिटकरी यांच्यावर केली.
हे ही वाचा