...अन्यथा तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार, आमदार नितेश राणेचं वरुण सरदेसाईंना प्रत्युत्तर
एका बाजूला सचिन वाझे (Sachin Vaze) अटक प्रकरण गाजत असताना आता त्यावरुन आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
मुंबई : लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. तपास यंत्रणांनी मागणी केल्यास त्यांना आम्ही पुरावे देऊ असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. काल वरुण सरदेसाई यांच्याकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आले ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल अशीही टीका त्यांनी केली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
NIA ने सचिन वाझे प्रकरणाची तपासणी करावी असं नितेश राणे यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं. धमकी कोणाला देत आहात? असा सवाल करत नितेश राणे यांनी आपण असल्या नोटिसांना अजिबात भीक घालत नाही असं वक्तव्य केलं. माझ्याकडे जी माहिती आहे ती NIA ने मागितली तर मी त्यांना देईन. ह्यांना कशाला देऊ ? असंही ते म्हणाले.
आमदार नितेश राणे म्हणाले की, "राणे कुटुंबियांनी 39 वर्षे बाळासाहेबांच्या सोबत सेवा केलीय. त्यामुळे यांची सगळी अंडी-पिल्ली आम्हाला माहित आहेत. आमचं तोंड उघडायला लावू नका अन्यथा रमेश मोरे, सोनू निगम नंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणे बाहेर काढली जातील. त्याची तयारी असेल तर पाठवा आम्हाला नोटीस."
पुन्हा अशा धमक्या देऊ नका, नाहीतर आणखी एक पत्रकार परिषद घेऊन ही सगळी प्रकरणे बाहेर काढावी लागतील. मग बघू महाराष्ट्रात कसे फिरता ते असंही आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केलं. मी पत्रकार परिषदमध्ये उपनगरातले नेते असा उल्लेख केला तर मग अनिल परब यांना बोलायची गरज काय ? हे काय नेते आहेत का ? अशी टीका त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर केली.
भाजप आमदार नितेश राणे यांनी सचिन वाझे प्रकरणात केलेला आरोप आणि त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्या भोवती आलेलं संशयाचं वर्तुळ यामुळं आपल्या वतीनं स्पष्टीकरण देत राणे यांना उत्तर देण्यासाठी म्हणून वरुण सरदेसाईंनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. युवासेनेचं काम करण्यासोबतच मी वडिलांसोबत त्याच्या व्यवसायात हातभार लावतो असं म्हणत आपण सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित कुटुंबातून आलो आहोत ही बाब अधोरेखित करत त्यांनी नारायण राणे, नितेश राणे यांच्या मागील काही महिन्यांत झालेल्या पत्रकार परिषदांचा आधार घेत राणे पिता-पुत्रांवर निशाणा साधला.
आपल्यावर सचिन वाझे प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे असून हे आरोप कोणत्याही तपास यंत्रणेच्या माध्यमातून सिद्ध करुन दाखवावेत. अन्यथा चुकीच्या आरोपांबाबत माफी न मागितल्यास सात दिवसांच्या कालावधीनंतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यासाठी त्यांनी तयार रहावं, असा इशारा सरदेसाई यांनी दिला होता.
सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांना भोवणार? आयुक्तपदासाठी विविध नावं चर्चेत