जालन्यातून बेपत्ता एसीबीचे पोलीस निरीक्षक अखेर खंडाळ्यात सापडले, 13 दिवसांनी लागला शोध
गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेले संग्राम ताटे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे पोलिसांना आढळून आले आहेत.त्यांना शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
जालना : जालना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे (ACB PI Sangram Tate) यांचा अखेर पोलिसांना शोध लागला आहे. गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेले संग्राम ताटे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे पोलिसांना आढळून आले आहेत. 2 तारखेला पत्नीला मित्राकडे जातो म्हणून निघून गेलेले ताटे तेव्हापासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जालना पोलिसांनी त्यांच्या शोधत तीन पथके तयार केली होती. दरम्यान काल रात्री ते सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामधील महामार्गावरील जुन्या टोलनाक्याजवळ आढळून आले. दरम्यान त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
13 दिवसांपूर्वी जालना शहरातील यशवंत नगर भागातल्या याच घरातून संग्राम ताटे आपल्या पत्नीला मित्राकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी आपले दोन्ही मोबाईल आणि पैशाचे पॉकेट घरीच ठेवले होते.
त्यांनी आपल्या पत्नीला मी मित्राकडे जात असल्याच सांगितलं आणि त्या नंतर ते घरी फिरकले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्या पत्नीने शहरातील कदिम पोलीस ठाण्यात मिसींगची केस दाखल केली होती. त्यानंतर एसीबी, एसपी तसेच गुन्हा दाखल झालेल्या पोलीस स्टेशनच्या स्वतंत्र तीन पथकाकडून शोधमोहीम सुरु होती.
पोलिसांना घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर एक cctv फुटेज भेटले होते. सुरवातीला एका रिक्षाने याशहरातील मोतीतलाव भागात आले जिथून एक लाल रंगाच्या गाडी मधून ते औरंगाबादच्या दिशेने गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज तब्बल 13 दिवसांनी ताटे हे खंडाळ्यात आढळून आले आहेत. आता त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना जालन्यात परत आणल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याबाबत अधिकची माहिती कळू शकणार आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
इतर महत्वाच्या बातम्या