(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhir Mungantiwar : तिकिट कापण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भीती संपवा, वजन वापरा म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेचं तिकीट, चंद्रपुरात कुणाला गुलाल?
मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याला उमेदवारी नकोच असं म्हटलं होतं. शक्य असेल तर उमेदवारी कट करण्यासाठी आपलं वजन वापरा असेही शब्द वापरले होते.
Sudhir Mungantiwar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) भाजपकडून दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भातील 10 पैकी चार जागांवर भाजपने उमेदवार घोषित केले आहेत. मंत्री सुधीर मनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली आहे. मात्र, सुधीर मुनगंटीवार गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या रिंगणात नको यासाठीच प्रयत्न करत होते का? अशी चर्चा रंगली होती.
सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरच्या लोकसभेच्या रिंगणात
मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याला उमेदवारी नकोच असं म्हटलं होतं. शक्य असेल तर उमेदवारी कट करण्यासाठी आपलं वजन वापरा असेही शब्द वापरले होते. मात्र, आता ते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरच्या लोकसभेच्या रिंगणात असतील. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण असेल हे महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर निश्चित होईल.
नागपूर लोकसभेमधून सलग तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आले आहे. पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचे नाव न आल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून गडकरी यांना थेट पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा आवाहन केले होते. मात्र, त्यांनी त्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. दुसरीकडे, भाजपने अकोलामधून उमेदवार बदलताना अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. अनुप धोत्रे हे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत. वर्धामधून सलग तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. एकूण चार जागांवर भाजप उमेदवार जाहीर केले आहेत. अजूनही सहा जागांवर भाजपकडून उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे.
काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना म्हणाले होते की, खरं तर ही संसद नवीन तयार झाली त्या दरवाज्याचा लाकूड आम्ही इथून, याच भागातून पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाज्यातून जायची आवश्यकता पडेल. ही मात्र भीतीपोटी भिती आहे आणि राज्य गीत तुमच्या अनुमतीने निवडलं आणि त्यामध्ये शेवटचे शब्द दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कुठे आता माझ्यावर बंधन पडेल का ही भीती मला वाटते आहे. म्हणून परवा मी तुम्हाला म्हटलं की या भीतीतून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापराव हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या