(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं; एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार, 5 जानेवारीपासून नोंदणी सुरू
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करणं सहज शक्य होणार आहे.
MHADA Lottery 2023 Updates : म्हाडाच्या (MHADA News) घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. म्हाडाच्या मुंबई (MHADA Mumbai) मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. गुरुवारी 5 जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला सादर करावा लागणार आहे. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधार कार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला सादर करावा लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी यापुढं कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली जाणार असून, अर्जदारांना आता एकदाच अर्ज केल्यास म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सदरील नोंदणी प्रक्रिया गुरुवार, 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
पाहा व्हिडीओ : Mumbai Mahada Home : म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी, 5 जानेवारीपासून नोंदणी
तात्काळ मिळणार घराचा ताबा
म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे सोडतीत विजयी होणाऱ्याला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येईल.
ऑनलाईन करता येणार नोंदणी
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणानं (MHADA) घरांची लॉटरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लॉटरी प्रक्रियेत बदल करण्यासोबतच म्हाडा प्रशासन आता लोकांची सोय लक्षात घेऊन मोबाईल अॅप तयार करत आहे. अॅपच्या माध्यमातून लोकांना संगणक किंवा लॅपटॉप तसेच मोबाईलवर घरी बसून या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अर्जदारांना लॉटरीत सहभागी होण्यासाठी मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्रं सादर करता येतात. यापूर्वी अर्जदारांना लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी म्हाडाच्या वेबसाईटचा एकच पर्याय उपलब्ध होता. परंतु आता मोबाईल अॅपद्वारेही नोंदणी करणं शक्य होणार आहे.
म्हाडाचं घर मिळवण्यासाठी लाखो लोक अर्ज प्रक्रियेत सहभागी होतात. एकाच वेळी शेकडो अर्ज जमा झाल्यामुळे अनेक वेळा म्हाडाचा सर्व्हर डाऊन होतो. नोंदणी करताना अर्जदारांच्या अडचणी वाढतात. गेल्या सोडत प्रक्रियेदरम्यान म्हाडाच्या एका घरासाठी 10 हून अधिक अर्ज आले होते. सध्या स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जात आहे. अर्ज सादर करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाल्यानं लोकांच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.