MHADA Exam : म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न, चौघं ताब्यात, पुणे सायबर पोलिसांची कारवाई
MHADA Exam Latest Update : एकीकडे म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे दुसरीकडे पुणे सायबर पोलिसांनी म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं आहे.
MHADA Exam Latest Update : पुणे : एकीकडे म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दुसरीकडे पुणे सायबर पोलिसांकडून खळबळजनक कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. ठाणे, औरंगाबाद आणि पुण्यातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. याबाबत पोलिसांना काही पुरावेही मिळाले होते, अशी माहिती मिळाली आहे. म्हाडाचा आज होणारा पेपर लीक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पुण्यात जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुख व दोन एजंटला अटक करण्यात आली आहे. तर औरंगाबादमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G
आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.
आज म्हाडा साठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ट्विट करून दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
काही दिवसांपूर्वी या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत. त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल असं जाहीर केलं होतं. यासोबतच त्या दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता. आज ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी काही तांत्रिक कारणास्तव आपण ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं म्हटलं आहे.