PM Kisan : पीएम किसानच्या यादीतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळलं, 21 व्या हप्त्याचे 2000 तुम्हाला मिळणार का? यादीत नाव कसं तपासायचं?
PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचं वितरण 19 नोव्हेंबरला केलं जाणार आहे. 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या दिवशी जमा होतील.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्यासाठी 18000 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहे. पूरस्थितीमुळं यापूर्वी चार राज्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मी राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीच पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळाला आहे.
PM Kisan 21 Installment : पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी मिळणार?
महाराष्ट्रातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. त्याअपडेटनुसार 21 व्या हप्त्याच्या यादीतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलं आहे. केंद्रानं आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे योजनेच्या निकषात अपात्र ठरणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांची नावं कमी करण्यात आली आहे. यामुळं काही शेतकऱ्यांसमोर त्यांचं नाव पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत नाव कसं शोधायचं ते पाहणार आहोत.
PM Kisan Beneficiary List : पीएम किसानच्या यादीत नाव कसं शोधायचं?
स्टेप 1 : तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : राज्य निवडा असा पर्याय आहे त्यात महाराष्ट्राची निवड करा.
स्टेप 3 : तुमचा जिल्हा निवडा.
स्टेप 4 : तालुका निवडा.
स्टेप 5 : गावाचं नाव निवडा, यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. यानंतर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी ओपन होईल. या यादीत तुमचं नाव शोधा.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये महाराष्ट्रातील 90 लाख 41 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पीएम किसानच्या 21 व्या हप्त्याची रक्कम 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. योजनेचा पहिला हप्ता 24 फेब्रुवारी 2019 ला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. तेव्हापासून 20 हप्त्यांची रक्कम पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये दिले जातात. राज्य सरकारच्या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

























