Sheikh Hasina Verdict : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका आंदोलन प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांग्लादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सन 2024 साली हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, शेख हसीना यांच्याकडून हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचाराच्या घटनेनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार स्थापन झालं होतं.
बांगलादेशमध्ये सरकारविरुद्ध उफाळलेल्या जनक्षोभावेळी करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवरुन शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात त्यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीन सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध हा खटला चालवण्यात आला. 453 पानांच्या या निर्णयाचे वाचन करण्यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांनी हा निर्णय 6 भागांमध्ये सुनावणी केला जाईल असे सांगितले होते. बांगलादेशमधील टेलिव्हीजनवर या निकालाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
























