महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ, गोंधळात कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय
महाराष्ट्र साहित्य परिषदेची सध्याचीच कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कायम राहील हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे या सभेत आणखी गोंधळ झाला. ही सभा आज पुण्यात झाली.
पुणे : आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात पार पडली. या सभेत चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सध्याचीच कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कायम राहील हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे या सभेत आणखी गोंधळ झाला.
यावेळी मंचावर मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि कार्यवाह अशोक पायगुडे आहेत तर समोर साहित्य परिषदेचे सभासद उपस्थित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी मंडळ तीन वर्षांसाठी निवडणुकीद्वारे निवडण्यात येते. सध्याच्या कार्यकारी मंडळाची तीन वर्षांची मुदत यावर्षी संपत असल्याने येत्या मार्च महिन्यात साहित्य परिषदेची निवडणूक होणं अपेक्षित होते. मात्र कोरोनाचं कारण देत या कार्यकारी मंडळाने निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला.
एवढंच नाही तर पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी ठराव केला. कार्यकारी मंडळाच्या या वादग्रस्त ठरावाला साहित्य परिषदेच्या अनेक सदस्यांनी तीव्र विरोध केला. हा ठराव मंजुरीसाठी मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये आहे. यावर्षी कोरोनाचे कारण देत सध्याची कार्यकारिणी निवडणूक घेण्यास तयार नाही आणि पुढील पाच वर्षांसाठी स्वतःला मुदतवाढ मिळाल्याचही जाहीर केलं.