मुख्यमंत्र्यासंह दोन उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहंसोबत बैठक सुरु, कोणत्या पक्षाचा किती जागांवर आग्रह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm Eknath Shinde),उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात जागावाटपसंदर्भात बैठक सुरु आहे.
MahaYuti Meeting in Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm Eknath Shinde),उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात जागावाटपसंदर्भात बैठक सुरु आहे. यामध्ये कोण किती जागा लढवणार याची चर्चा सुरु आहे. भाजपचा किमान 150 जागांवर आग्रह आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 87 ते 90 जागांवर आग्रह आहे. तर अजित पवारांचा 60 जागा लढण्याचा आग्रह कायम आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जागावाटपाबाबत चर्चा सुरु
महायुतीच्या जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. कोणत्या पक्षानं किती जागा लढाव्या यावर अंतिम निर्णय कधी येणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्लीत दाखल होतील. त्यानंतर सर्वांची दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जाणार
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही.आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, चार दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी जागावाटपावरुन बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण तिनही पक्षाचे उमेदावर काही ठिकाणाहून इच्छुक आहेत. त्यामुळं तोडगा काढायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आज महायुतीच्या जागावाटपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.