लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचे समुपदेशन करत पोलीस ठाण्यातच लावला विवाह; कन्यादान्यासह संसारही दिला
अक्कलकोट (Akkalkot) येथे एका विवाहाची चर्चा आता जिल्ह्याभर पसरली आहे. लग्नास नकार देणाऱ्या एका प्रियकराचे समुपदेशन करत पोलीस ठाण्यातच त्यांचा विवाह लावला.
सोलापूर : अक्कलकोट येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. प्रियकर लग्नास नकार देत असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या मुलीचे कन्यादानच पोलिसांनी केले आहे. अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्यात 22 वर्षीय तरूणी आपल्या प्रियकरविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी तक्रारीचे सविस्तर कारण जाणून घेतले. आणि तरुणासह कुटुंबाचे समुपदेशन करत लग्नाचा बार उडवून दिला.
गेल्या सात आठ महिन्यापूर्वी मिस्त्री काम करणाऱ्या सचिन मंजुळकर यांची त्याच गावातील बिगारी काम करणाऱ्या यलव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पण मुलाच्या घरचे आंतरजाती विवाहासाठी लग्नास तयार नव्हते. मुलीच्या आईवडिलांचे सहा वर्षापुर्वीच निधन झाले आहे. ती आजीसोबत राहते. आजी पण वार्धक्याने घरीच असते. त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालविते. घरच्यांच्या विरोधामुळे मुलगा लग्नास टाठाटाळ करु लागला. त्यामुळे मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपली आपबीती पोलीस निरीक्षकांना सांगितले.
तेव्हा मुलगा सचिन मंजुळकर याला देखील पोलिसांनी बोलवून घेतले. त्याने लग्नास माझी संमती आहे. मात्र, आंतरजातीय लग्नास कुटुंबियांची परवानगी नसल्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी मुलाची समजूत घातली. तसेच त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचे देखील समुपदेशन केले. यावेळी मुलाचे कुटुंबीय देखील लग्नासाठी तयार झाले. मात्र, मुलगी अनाथ असल्याचे समजल्यानंतर स्वतः पोलीस निरीक्षक यांनीच पुढाकार घेत स्वतःच्या मुलीप्रमाणे कन्यादान केले. यावेळी सर्व पोलिसांनी स्वतः च्या खर्चाने पोलीस स्टेशनच्या आवारातच लग्न लावून दिले. यावेळी संसारउपयोगी साहित्य, सोने, साडी आणि आहेर देखील पोलिसांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक वेळी शिक्षा न करता समुपदेशाने देखील एकाद्याचे कुंटुंब उभे राहू शकते याचे उदाहरण अक्कलकोट पोलिसांनी दाखवून दिले आहे.
यावेळी उपस्थित पोसई छबु बेरड, सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण लोकरे, पोहेका सुरेश जाधव, अजय भोसले, हवालदार संजय पांढरे, सुनिल माने, एजाज मुल्ला, शिपाई अमोघसिद्ध वाघमोडे, केदारनाथ सुतार, महादेव शिंदे, महिला पोलीस नाईक चमेली राजमाने, महिला पोलीस शिपाई जोस्ना सोनकांबळे होते.