Marathwada Sowing Update : मराठवाड्यात आतापर्यंत किती पाऊस पडला? किती पेरण्या झाल्या?; कृषीमंत्र्यांनी सांगितली आकडेवारी
Marathwada Sowing Update : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील पावसाची आकडेवारी सहित झालेल्या पेरण्याची माहिती दिली.
Marathwada Sowing Update : मराठवाड्यात (Marathwada) पेरणीयोग्य पाऊस (Rain) झाला नसल्याने 20 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी (Sowing) झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदील झालेला आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी विधानपरिषद नियम 96 अन्वये मांडली. यावर उत्तर देताना कृषीमंत्री धनजंय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पावसाची आकडेवारी सहित झालेल्या पेरण्याची माहिती दिली.
यावेळी बोलतांना मंत्री मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान पडत असल्याने या काळात खरीप आणि रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जूनच्या दरम्यान होते. यावर्षी 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. 25 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्र मान्सून पर्जन्यमानाने व्यापला आहे. तर राज्यात जून महिन्यात सरासरी पर्जन्यमान 207.6 मिमी असून प्रत्यक्षात 111.3 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीच्या 54 टक्के पाऊस झाला. तर राज्यात 1 जून ते 23 जुलै पर्यंत सरासरी पाऊस 453.1 मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस 441.5 मिमी असून, सरासरी 27.4 टक्के आहे.
मराठवाड्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 134.0 मिमी असून प्रत्यक्षात 55.5 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीच्या 41.4 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात 01 ते 23 जुलै पर्यंत सरासरी पाऊस 272 मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस 251. मिमी आहे. म्हणजेच सरासरी 92.3 टक्के आहे.
मराठवाड्यात 42.65 लाख हे. क्षेत्रावर पेरणी
23 जुलै अखेरपर्यंत राज्यात 114.25 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या 80% आहे. गतवर्षी याच कालावधीत 127.12 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती. मराठवाडा विभागाची सरासरी पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर आहे. 23 जुलै अखेरपर्यंत मराठवाड्यात 42.65 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या 88 % आहे. गतवर्षी याच कालावधीत 45.33 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती.
मराठवाड्यात 23 जुलै अखेरपर्यंत सोयाबीन पिकाची 22.33 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, कापूस पिकाची 12.80 लाख हेक्टर, तूर पिकाची 3.15 लाख हेक्टर, मका पिकाची 2.14 लाख हेक्टर, उडीद पिकाची 0.72 लाख हेक्टर, मूग पिकाची 0.64 लाख हेक्टर तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: