Marathwada Rains : पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान; हिंगोलीत फूलशेती उद्ध्वस्त, लातूरमध्ये वीज कोसळून महिलेसह दोन जनावरांचा मृत्यू
Marathwada Rains : मराठवाड्यात काल झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे् मोठे नुकसान झाले. हिंगोलीत फूलशेती उद्ध्वस्त झाली. लातूरमध्ये वीज कोसळून महिलेसह दोन जनावरांचा मृत्यू तर परभणीत नाले-ओढ्यांना पुन्हा पाणी आले
Marathwada Rains : मराठवाड्यात काल (28 सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे लातूर (Latur), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात नुकसान झाले आहे. कमी कालावधीत झालेल्या या तुफान पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतरही पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी सोयाबीन लागवडीपासूनच सतत होणारा पाऊस, शंख गोगलगाय, रोगराई असे संकट सुरु होते. यातून जी पिके वाचली त्यांना या पावसाचा फटका बसला आहे.
जोरदार वारे आणि विजेच्या कटकडाटासह झालेल्या पावसाने जीवितहानी देखील झाली आहे. लातूर जिल्ह्यात एक महिला आणि दोन जनावरे वीज पडून प्राणास मुकले आहेत. हिंगोलीतील फुल शेती पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. तसेच इतर पिकाचेही नुकसान झाले आहे. परभणीत तीन दिवसांपासून पावसाने पाठ सोडली नसल्यामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसापासून सतत पावसामुळे अनेक शेत शिवारात पाणी जमा झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेले आहे. पावसाने आता उसंत घेतली नाहीतर तर नुकसान न भरुन येण्यासारखी स्थिती तयार होईल
हिंगोलीत फूलशेतीचं मोठं नुकसान, ओढ्यांना पूर
हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि आताच शेतकऱ्याच्या हातात येणाऱ्या झेंडूच्या फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झेंडूच्या फुलांमध्ये पाणी साचले असून संपूर्ण झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगामी दसरा सणाला ही सर्व झेंडूची फुलं शेतकऱ्याला मोबदला मिळवून देणार होती.
तर दुसरीकडे जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला होता. वाई बोल्डा रोडवरील ओढ्याला पूर आल्याने अनेक मजूर अडकून पडले होते. अखेर या मजुरांना जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने या बाहेर काढण्यात आले. तसेच प्रवास करणाऱ्या अनेक गाड्या या पुरामुळे थांबलेल्या होत्या.
परभणीत सलग तीन दिवस पाऊस, काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान
परभणीत सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली सोयाबीनचे पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने येलदरी आणि लोअर दुधना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. शिवाय नाले-ओढ्यांनाही पुन्हा पाणी आले आहे.
Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये फटका