छत्रपती संभाजीनगरला 'ऑरेंज अलर्ट', मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात मुसळधारा? IMD नं सांगितलं..
Marathwada Rain: मागील 6 तासांत अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता नैऋत्येकडे सरकला आहे. त्यामुळं विदर्भासह मराठवाड्यावर पुढील 12 तास कमी दाब राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Marathwada Rain: अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाच्या सक्रीयतेमुळं राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यात पावसानं हैदोस घातला असून हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडाली आहे. पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा दिलाय.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, मागील ६ तासांत अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता नैऋत्येकडे सरकला आहे. त्यामुळं विदर्भासह मराठवाड्यावर पुढील १२ तास कमी दाब राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात तुफान पाऊस होत असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेलाच आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरण भरलं आहे.
सकाळपासून झाला एवढा पाऊस
दरम्यान सोमवारी सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस सुरु असून आयएमडीचे पुणे येथील प्रमुख के. एस होसाळीकर यांनी x समाजमाध्यमावर पोस्टही केली आहे.
वैजापूर 22 कन्नड 41 सिल्लोड 108
फुलंब्री - 83
गंगापूर - 56
पैठण - 67
खुलताबाद - 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Chatrapati sambhaji Nagar District RF 2.09.2024 (in mm)
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2024
Vaijapur 22
Kannad 41
Sillod 108📌
Phulambari - 83☔
Gangapur - 56
Paithan - 67
Khultabad - 40
सिल्लोड तालुका
सिल्लोड 108
भराडी 81
अंभई 131
अजिंठा 123
गोळेगाव बु. 133
आमठाणा 90
निल्लोड 115
बोरगाव बाजार 100
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय?
हवामान विभागानं जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून छत्रपती संभाजीनगरला पावसाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह व वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणाचे धनंजय मुंडेंचे आदेश
पावसाचा जोर ओसरल्यावर पंचनामे करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादेत कळवावी, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिले आहेत. बीड, हिंगोली, परभणी, वाशिम, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून अनेक भागांत शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.