Marathwada Liberation Day: ..ते 109 तास निजामाला नामोहरम करणारे, निजामाच्या तावडीतून मराठवाडा सुटला कसा?
हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्याची वाट पाहण्यासाठी तब्बल 13 महिने अधिक द्यावे लागले. शेवटी 17 सप्टेंबर 1948 अखेर हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून सुटलं.
![Marathwada Liberation Day: ..ते 109 तास निजामाला नामोहरम करणारे, निजामाच्या तावडीतून मराठवाडा सुटला कसा? Marathwada Liberation Day History Hyderabad liberation Day How Hyderabad sansthan got freedom from nizam Marathwada Liberation Day: ..ते 109 तास निजामाला नामोहरम करणारे, निजामाच्या तावडीतून मराठवाडा सुटला कसा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/17/c3c53e2578f857cdaea619db10fa53a617265517009091063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathwada Liberation Day: भारतात 14 ऑगस्टची रात्र स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन उगवली आणि दीडशे वर्षांची ब्रिटिशांची राजवट संपून स्वातंत्र्याचे स्वप्न सत्यात उतरलं. पण त्याचवेळी भारताचा सव्वा दोन लाख स्क्वेअर किमी चा भूभाग पारतंत्र्यात होता. हा भूभाग म्हणजे हैदराबाद संस्थान. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी निजामाच्या तावडीतून हैदराबाद संस्थान काही सुटलं नव्हतं. हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्याची वाट पाहण्यासाठी तब्बल 13 महिने अधिक द्यावे लागले. शेवटी 17 सप्टेंबर 1948 अखेर हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून सुटलं. पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. निजामाच्या जुलमी राजवटीत होणारी हैदराबाद संस्थानाची घुसमट हळूहळू वाढत होती.
हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकवण्यास निजामानं घातली होती बंदी
देश स्वतंत्र झाल्यावर तिरंगा फडकवणे ही सगळ्या भारतीयांची ब्रिटिशांचा लगाम जुगारून देण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया होती. पण स्वतंत्र भारतात हैदराबाद संस्थानात मात्र, तिरंगा फडकवला तर याद राखा ..अशी ताकीदच निजामानं रझाकार संघटनेला देऊन ठेवली होती. निजामाच्या या धमकीला न जुमानता स्टेट काँग्रेस कमिटीने सात ऑगस्ट रोजी एकता दिवस पाळायचा असं ठरवलं होतं. देशातील सर्व संस्थाने भारतात सामील होतील त्यादिवशी सर्व संस्थांमध्ये जागोजागी तिरंगा फडकवायचा असा पण केला होता. याच दिवशी स्वामी रामानंद तीर्थयांनी हैदराबादत भारताचा ध्वज फडकवला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. जीव गेला तरी आम्ही तिरंगा फडकवणारच असं स्वामी रामानंद तीर्थ म्हणाले होते. त्यांचे हे शब्द खरे ठरले पण हैदराबाद संस्थानातील जनतेला मोठ्या अग्नी दिव्यातून जावं लागलं. अनेकांना दुसऱ्या राज्याचा आश्रय घ्यावा लागला. मराठवाड्यातील अनेक कुटुंब मध्य प्रांतात गेल्याच्या नोंदी आहेत.
रझाकारांनी भारताचे तिरंग्याच्या चिंधड्या केल्या..
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून पोस्ट ऑफिस वर तसेच जिल्ह्यातील मुख्य चौकांमध्ये झेंडे लावले होते. रजाकारांनी या झेंडांवर गोळ्या झाडल्या. कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडे ओरबाडले. परभणी लातूर औरंगाबाद उस्मानाबाद या ठिकाणी असलेले झेंडे ही उतरवण्यात आले होते. निजामाचे पोलीस यावेळी बघ्याची भूमिका घेत होते. त्यांच्या डोळ्यात देखत भारताच्या तिरंगाच्या चिंधड्या केल्या जात होत्या.
हैदराबादमध्येही स्वातंत्र्य चळवळीची बीजं होती. भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आल्यावर ही चळवळ आणखीन पेटून उठली. स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करता येणार नाही याची चोख खबरदारी निजामानं घेतली होती. जागोजागी पोलीस आणि घोडेश्वर तैनात करण्यात आले होते. रजाकारांचे फौजही त्यांच्या हाताशी होती. 7 ऑगस्ट चा दिवस हा खऱ्या अर्थाने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा पाया ठरला.
प्रभातफेरीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा चोप
काँग्रेसने भारतीय एकता दिन 7 ऑगस्टला प्रभात फेरी काढण्याचा ठरवलं होतं. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा रझाकारांच्या कानात घुमू लागल्या होत्या. स्वातंत्र्याचा इच्छेन हैदराबाद संस्थानातील जनतेत उत्साह संचारला होता. ही प्रभात फेरी पाहताच रजाकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करून अनेकांना तुरुंगात डांबून ठेवलं. गर्दी पांगवण्यासाठी निजामाच्या पोलिसांनी प्रभात फेरी भोवती वेढा घातला. लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली अनेकांना अटक करण्यात आली.
ते 109 तास निजामाच्या तावडीतून सुटणारे...
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने निजामाबरोबर वाटाघाटी सुरू केली होती पण त्यात तोडगा काही निघत नव्हता. कित्येक महिने यात निघून गेले. सरदार पटेल यांनी लोकांच्या इच्छेला डावलू नका असा सल्ला निजामाला दिला होता पण मी उस्मान अलीनं त्यांच्या सूचना गांभीर्याने घेतला नाही आणि 1948 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन घेतली. ते 109 तास निजामासाठी अतिशय अवघड होते. निजाम आणि रजाकरांच्या फौजेनं शेवटी गुडघे टेकले. आणि 13 महिने उशिराने हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)