अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट; ताबा कोल्हापूर पोलिसांना मिळणार की नाही याचा उद्या फैसला
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांसोबत अकोट पोलिसांनी ही ताबा घेण्यासाठी अर्ज केला आहे.
मुंबई : अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. सदावर्ते यांच्या वकिलांना या संदर्भात कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करणार असून ताबा घेण्यासाठी युक्तिवाद होणार आहे. उद्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना मिळणार की नाही? ठरणार आहे.
मुंबई आणि सातारा पोलीस कोठडीतल्या मुक्कामानंतर आता वकील गुणरत्न सदावर्तेंचा पुढचा मुक्काम कोल्हापुरात असण्याची शक्यता आहे. कारण कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचं पथक वकील गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झालंय. पवारांच्या घरावरील आंदोलनप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबईत अटक झाली होती. मराठा आरक्षणावर बोलताना छत्रपतींच्या वारसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर सातारा आणि कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी (18 एप्रिल) सातारा न्यायालयानं गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणण्यात आलंय. शरद पवारांच्या घरावरील आंदोलनप्रकरणी इतर तिन्ही आरोपी संदीप गोडबोले, अजित मगरे आणि मनोज मुदलीयार याला 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं होतं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून या प्रकरणी कसून चौकशी सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :