Manoj Jarange : तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही, सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या पणजोबांची कुणबी नोंद आढळून आली. त्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बीड : जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही, तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा (Kunbi Record) लाभ घेणार नाही, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी स्पष्ट केलं. माझ्या कुणबी प्रमाणपत्राविषयी काय चर्चा झाली ते मला माहित नाही. जसं इतरांचं सापडलं तसंच माझंही सापडलं असेल. पण माझ्या वडिलांनी ते स्विकारलं असेल तर मला माहिती नाही. पण जर वडिलांनी त्यांनी ते स्विकारलं नसेल तर आम्ही ते स्विकारणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
सगळाच मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. मी कुठला नवसाचा नाही, जसा गोरगरिबांचा सापडलं तसंच माझी नोंद सापडली असेल. कारण आम्ही आमच्यासाठी हापापले नाही आहोत. हा लढा आमच्या लेकरांसाठी सुरु आहे. त्यामुळे माझ्यासकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेल तेव्हा मी ही नोंद स्विकारेन, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. माझी कुणबी नोंद सापडली माझे वडिल तिथे गेले होते, पण ते तिथे गेले की त्यांना नेलं होतं हा देखील प्रश्न असल्याची शंका देखील जरांगेंनी व्यक्त केली. मागील तीन चार दिवसांपासून माझ्याच प्रमाणपत्राची का चर्चा केली जातेय, याची देखील शंका मला वाटायला लागली असल्याचं जरांगेंनी म्हटलं.
सगळ्या गावाच्या नोंदी सापडल्या - रावसाहेब जरांगे (मनोज जरांगेंचे वडिल)
शिरुर तहसील कार्यालयामध्ये मनोज जरांगे यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद आढळली नसल्याचं समोर आलं होतं. पण आता आमच्या सगळ्या गावाच्या कुणबी नोंदी इथे सापडल्या असल्याची माहिती मनोज जरांगे यांचे वडिल रावसाहेब जरांगे यांनी दिली. पुढे त्यांनी म्हटलं की, फेरतपासणी करण्यासाठी तुम्ही आमच्या नोंदी पुन्हा तपासू शकता.
जरांगे पाटलांचा मुंबईत एल्गार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आता मुंबईच्या मैदानाची निवड केली आहे. त्यासाठी 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. . 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तर, आंतरवाली सराटी- अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईला ही पायी दिंडी पोहचणार आहे.
मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जालना,शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे असे दिंडी पोहचेल. त्यानंतर पुढे पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहचणार आहे. दिंडीच्या आसपासच्या गावातल्या लोकं त्या-त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील. सगळ्या नियोजनाचं पीडीएफ तयार करून कार्यकर्त्यांना व्हॉट्सॅपच्या माध्यमातून पाठवण्यात येणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
पोटातलं ओठांवर आलं! अजित पवार अपघाताने सत्तेत, त्यांना आम्ही सरकार मानत नाही: मनोज जरांगे